आदित्य ठाकरेंची ‘निष्ठा यात्रा’ शिवसेनेतील गळती थांबवणार?
मुंबई : मागील पंधरा दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीत गळचेपी होत असल्याच्या कारणाने शिवसेनेतील जवळजवळ चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारलं. आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत आता सरकारही स्थापन करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले आहेत.
शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाकडून दावा करण्यात येत आहे. हा शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्यासोबत उरलेल्या नेत्यांसाठी मोठा धक्काच आहे. उध्दव ठाकरेंकडे आता फक्त १५ आमदार शिल्लक राहिलेले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत उरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चलबिचल दिसत आहे.
ठाण्यातील अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते हे शिंदे गटाला जाऊन भेटले आहेत. आणखी कार्यकर्ते शिंदे गटाकडे जात आहेत. शिवसेनेतील उर्वरित कार्यकर्त्यांची गळती थांबवण्यासाठी आता आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढण्याची तयारी सुरु केली आहे. उद्या (शुक्रवार) पासून ते मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात निष्ठा यात्रा काढणार आहेत. शिवसेनेत असलेल्या कार्यकर्त्यांना ते विश्वासात घेणार असून शिंदे गटासोबत गेलेल्या कार्यकर्त्यांशी देखील ते संवाद साधणार आहेत. मात्र निष्ठा यात्रेने शिवसेनेतील गळती थांबेल का याकडे सर्वांचं लक्षं लागलेलं आहे.