“दारूच्या नशेत एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार”; गुवाहाटीत नेमकं घडलं काय? अॅड . असीम सरोदेंनी केले धक्कादायक आरोप
धाराशिव | कायदेतज्ज्ञ असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा उल्लेख करत काही गंभीर आरोप केले आहेत. रविवारी धाराशीवमध्ये झालेल्या ‘निर्भय बनो’ सभेमध्ये बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. तसेच, यासंदर्भात चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही असीम सरोदेंनी केली आहे. (Maharashtra Politics)
असीम सरोदे काय म्हणाले ?
धाराशिव येथे रविवारी संध्याकाळी ‘निर्भय बनो’ सभा पार पडली. यावेळी असीम सरोदेंनी (Adv. Asim Sarode) शिंदे गटाच्या बंडावेळी गुवाहाटीमध्ये काय घडलं होतं? यासंदर्भात काही दावे केले आहेत. “गुवाहाटीतल्या त्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेले. ८ किलोमीटर गेल्यानंतर त्यांना पकडून आणलं गेलं. त्यांना हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कुणी मारहाण केली?” असा सवाल असीम सरोदेंनी उपस्थित केला आहे.(Political News)
एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न ?
असीम सरोदेंनी आपल्या भाषणात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये तेव्हा थांबलेल्या एअर होस्टेसचा विनयभंग व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी कोणत्याही आमदाराचं नाव घेतलेलं नसलं, तरी त्यांनी त्यावेळी त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा यावेळी भाषणात उल्लेख केला.
“गुवाहाटीत ज्या हॉटेलमध्ये हे सगळे थांबले होते, तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. पण स्पाईसजेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी त्यांच्यासाठी काही खोल्या तिथे बुक केल्या होत्या. त्या हॉटेलशी त्यांचं वर्षाचं कंत्राट होतं. तिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहात होत्या. त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला? हे महाराष्ट्रानं शोधलं पाहिजे. दारूच्या नशेत हे नेते झिंगत होते. हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही”, असं असीम सरोदे उपस्थित लोकांना उद्देशून म्हणाले.