“नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी वृक्षतोड करण्याशिवाय पर्याय नसतो”; आयुक्त सिंह यांचे वृक्षतोडीला समर्थन
निगडी | शहरात पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने 27 व्या रानजाई महोत्सवाला सुरुवात झालीये. फळे, भाज्या, विविध प्रजातींची झाडे, फुले यांचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. महापौर निवास निगडी प्राधिकरण येथील मोकळ्या मैदानात १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत करण्यात आले.
या महोत्सवाला भेट दिल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उल्हास जगताप, उपायुक्त रविकिरण घोडके यावेळी उपस्थित होते. पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाला अडथळा ठरणारी संरक्षण खात्याच्या जागेवरील १४२ झाडे तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. यावर आयुक्त शेखर सिंह यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले.
काय म्हणाले आयुक्त शेखर सिंह?
नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी आणि विकासकामांची अंमलबजावणी करण्यासाठी झाडांचे पुनर्रोपण किंवा वृक्षतोड करण्याशिवाय पर्याय नसतो, असे सांगत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वृक्षतोडीचे समर्थन केले आहे.
शहरात विविध ठिकाणी हजारोंच्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात असून त्यात प्रामुख्याने देशी झाडांची लागवड केली जात आहे. शहरातील वातावरण पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी तळवडे येथे महापालिकेच्या वतीने जैवविविधता उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. ५० एकरमध्ये उभारण्यात येणाऱ्या या पार्कमुळे शहराला एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. नागरिकांना पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे.