रूबी हॉल ते रामवाडी मेट्रोचे अखेर होणार उद्घाटन
काँग्रेसच्या आंदोलनाला मिळाले यश – माजी आमदार मोहन जोशी
पुणे | पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग (Pune Metro) सुरू होणे गरजेचे होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोयीची वेळ मिळत नसल्याने तिथपर्यंत मेट्रो सेवा सुरू होत नव्हती, या विरोधात काँग्रेस पक्ष आणि ‘वेकअप’ पुणेकर यांनी जनमताचा रेटा उभा केला, त्याला यश आले, परिणामी येत्या ६ मार्च रोजी मेट्रो मार्गाचे उदघाटन होत आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी व्यक्त केली आहे. (Latest Pune News)
पुणेकरांना शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. यावर उपाययोजना म्हणून वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग चालू होणे खूप गरजेचे आहे. लांब अंतरापर्यंत मेट्रो धावली तर जास्तीत जास्त पुणेकर तिचा लाभ घेतील. कोथरूडहून स्टेशनपर्यंत जाणाऱ्यांची सोय होईल आणि रस्त्यावरील वाहतुकीचा, रहदारीचा ताण कमी होईल. मात्र, ते लक्षात न घेता पंतप्रधानांच्या सोयीसाठी निम्म्याहून अधिक मेट्रो मार्ग अडविला गेला होता. या प्रकाराच्या विरोधात पुणेकरांचा आवाज उठविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली. अलीकडेच समाजसेवक सार्वजनिक काका यांच्या पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलनही केले होते. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला होता. ‘वेकअप’ पुणेकर अभियानांतर्गत वाहतूक तज्ज्ञ आणि मेट्रो अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यातून जनमताचा रेटा निर्माण केला. त्यापुढे सत्ताधारी भाजपला झुकावे लागले. ऑनलाईन पद्धतीने का होईना पंतप्रधान मोदी ६ तारखेला मेट्रो मार्गाचे उदघाटन करणार आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
मेट्रो सेवा मुळात काँगेसचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प राबवताना २०१४ पासून भारतीय जनता पक्षाने यात उदंड राजकारण केले. त्यांच्यातील अंतर्गत वादात प्रकल्प लांबत गेला आणि खर्च वाढला. आजही भाजपचे तेच राजकारण चालू आहे. पुण्याचे प्रश्न सोडविण्याविषयी त्यांच्यात अनास्थाच आहे. लोहगाव विमानतळ टर्मिनल २ विमान वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. पण, तिथेही भाजपचे श्रेयाचे राजकारण चालू असून, उदघाटन अजूनही झालेले नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.