गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त

मुंबई : कोरोनाकाळात सलग दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. निर्बंध असल्याने सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यावेळी त्यावरील निर्बंध मागे घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील सर्व गणेशोत्सव पदाधिकाऱ्यांची आणि संघटनांची बैठक झाली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदाची नवरात्रोत्सवात गरबा-दांडियाला १२ वाजेपर्यंत परवानगी मिळणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वांनाच आता गरबा-दांडियाचे वेध लागले आहेत. मागील दोन वर्षे कोरोनामुळे गरब्याला मुकलेली तरुणाई यावर्षी गरबा खेळायला मिळेल, म्हणून उत्साहात आहे. अशातच नवरात्रोत्सवात यंदा गरबा रंगला, तरी त्याला वेळेचे बंधन किती असेल? याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला आहे. मात्र यंदाच्या नवरात्रोत्सवात गरबा-दांडियाला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी, अशी विनंती करीत याबाबत ठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे.
दि. २६ सप्टेंबर ते दि. ४ ऑक्टोबरपर्यंत यंदा ९ दिवस राज्यात व उत्तर मुंबईत ठिकठिकाणी नवरात्रोत्सवात गरबा-दांडियाचे आयोजन केले आहे. सर्व जाती धर्माचे नागरिक कायद्याचे पालन करत नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करतात. गुजरात, राजस्थान व इतर राज्यांत जशी ९ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत गरबा-दांडियाला परवानगी दिली जाते, तशीच परवानगी आपल्या महाराष्ट्रात द्यावी, अशी मागणी आमदार सुर्वे यांनी केली.