बीडमध्ये आणखी एक भीषण अपघात; रूग्णाला घेऊन जात असताना रूग्णवाहिकेचा अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

बीड | Beed Accident : बीड (Beed) जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगरकडे रूग्णाला घेऊन जात असताना रूग्णवाहिका आणि ट्रकचा मोठा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
रात्री 12च्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सांगवीपाटण येथील डॉ. राजेश झिंजुर्के आणि रूग्णवाहिकेचा चालक भरत लोखंडे आणि अन्य दोण जण अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण जखमी असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक अहमदनगरकडे जात होता. त्यावेळी व्यंकटेश कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना रूग्णवाहिकेने ट्रकला मागून जोरात धडक दिली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.