“आत्ताचं राजकारण आयपीएलसारखं, दररोज…”; अशोक चव्हाणांंची खंत
जालना | Ashok Chavan – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. “एकेकाळचं राजकारण पाच पाच वर्षे चालायचं. आत्ताचं राजकारण आयपीएलच्या ट्वेन्टी ट्वेन्टी मॅचसारखं झालं आहे. दररोज बॅटिंग करत चौकार-षटकार मारावे लागतात. कधी कधी वाटतं कामाचा आणि मतांचा संबंध राहिलाय का?”, अशी खंत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. ते जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनामधील राजकीय परिसंवादामध्ये बोलत होते.
यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, “आजच्या परिस्थितीचा विचार केला तर जे देशात घडतंय ते राज्यात घडतं, जे महाराष्ट्रात घडतंय ते मराठवाड्यात घडतंय, त्यात नवीन काहीच नाही. आता वेळ आलीय आयपीएलची (IPL), ट्वेन्टी ट्वेन्टी मॅचची. एकेकाळचं राजकारण टेस्ट मॅचसारखं (Test Match) होतं, पाच-पाच वर्ष चालायचं. आता रोज काहीतरी नवीनच आहे. रोज बॅटिंग करा, षटकार मारा, चौकार मारा, रोज काहीतरी नवीन विषय द्या आणि त्याचा परिणाम मतांवर होईल सांगता येत नाही.”
“कधी कधी विचार करतो, कामाचा आणि मतांचा काही संबंध राहिला आहे का? आम्ही कामं करतो, एवढी कामं झाली या भागात तरी असं घडतं. म्हणजे मतदानाचा आणि कामाची सांगड लागत नाही. कुठल्या दिशेनं सगळं चाललं आहे? आयपीएलच्या दिशेनं सगळं चालू आहे का? अशाप्रकारची परिस्थिती विद्यमान राजकारणात झालेली आहे, असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं”, असंही अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान, 10 ते 12 डिसेंबर दरम्यान 42 वं मराठवाडा साहित्य संमेलन जालना जिल्ह्यातील घनसावंगीमध्ये पार पडलं. स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड संचलित संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. शेषराव मोहिते (Shesherao Mohite) या संमेलनाचे अध्यक्ष होते तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं.