
दुसरा अध्याय ज्यात स्थितप्रज्ञ लक्षणे दिलेली आहेत. स्थितप्रज्ञता म्हणजे तटस्थपणे पाहण्याची वृत्ती होय.सुख, दु:ख, यश, अपयश या परस्परविरोधी गोष्टी आपल्या आयुष्यात घडत राहतात.मराठीत एक भावगीत आहे.
अशीच दुनिया जगेल जगली!
कधी उन तर कधी साउली!!
मनाला स्थिरता शिकवली तर आनंदाचा उन्माद किंवा दु:खाने आत्महत्येचा विचार येणे घडणार नाही. अस्तिकवादी देवावर विश्वास ठेवतात ज्यामुळे होकारात्मक विचार सुरू होऊ शकतात. अात्यंतिक भावनाविवशता उपयोगी नाही. अपेक्षा आणि अपेक्षाभंग उपयोगी नाही.
ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या निराशेला दूर ठेवू शकतात.
तरि या देहावरी! उदासु ऐसिया परी!
उखिता जैसा बिढारी!
बैसविला आहे !!५९३!!
कां झाडाचि साउली! वाटे जाता मीनली!
घरावरी तेतुली! आस्था नाही!! ५९४!!
साउली सरिसीच असे! परी असे नेणिजे जैसे!
स्त्रियेचे तैसे! लोलुप्य नाही!!५९५!!
आणि प्रजा जे जाली! तिये वस्ती किर आली!
कां गोरुवे बैसली! रुखातळी!!५९६!!
किंबहुना पुंसा ! पांजरिमाजी जैसा!
वेदाज्ञेसी तैसा! बिहुनि असे!!५९८!!
एऱ्हवी दारागृहपुत्रीं! नाही जया मैत्री!
तो जाण पा धात्री! ज्ञानेसी गा!!५९९!!
आणि महासिंधु जैसे! ग्रीष्मवर्षी सरिसे!
इष्टानिष्ट तैसे! जयाचा ठायी!!६००!!
कां तिन्ही काळ होता! त्रिधा नव्हे सविता!
तैसा सुख-दु:खी चित्ता!भेदु नाही!! ६०१!!
जेथ नभाचेनि पाडे! समत्वा उणे न पडे!
तेथेचि रोकडे ! वोळख तूं!!६०२!!
माऊलींचे निरुपण ओ. ५९३ते६०२-
भावार्थ : आपला देह परमेश्वराने दिलेला प्रारब्ध योग आहे. पूर्व जन्मातील भोग आणि या जन्मात आपली कार्ये करावीत, म्हणून हा वर्तमान जन्म आहे. आत्मतत्त्व सत्य असून देह मरणाधिन आहे, समजल्यावर ज्ञानी मुमुक्षु माणसे देहाचे प्रेम बाळगत नाहीत. जसे प्रवासी रात्रीसाठी एखाद्या घराचा आश्रय घेतो. सकाळी उठून चालू लागतो त्याप्रमाणे तो देहाचे सुख-दुःखाविषयी उदासीन असतो. झाडाचे सावलीत पांथस्थ विश्रांती घेतात. झाड किंवा सावली बरोबर नेत नाही त्याप्रमाणे आपले घर हा गर्व मनात आणित नाही. आपल्याबरोबर असणारी सावली आपल्यापेक्षा निराळी आहे. तसे पत्नीचे प्रेम बाळगतो, पण गुंतुन राहत नाही. आपली मुले कशी आहेत. तर झाडाखाली जनावरे बसतात.
पण झाडाचे मनात त्या गायी म्हशीचे प्रेम नसते.तसे मुलांमध्ये ज्ञानी माणसे भावनिक गुंतत नाहीत. घर, जमीन, जुमला हा या देहासंबंधी आहे, म्हणून आपल्या संपत्तीत तो गुंतन तो राहत नाही. पिंजऱ्यातील पोपट नेहमी जिथे राहतो त्यांना खुश करण्यासाठी बडबड करतो. तसे साधकाने शरीराला पिंजरा मानून वेदाज्ञा म्हणजे पाचारण न करणे. पुण्यकर्म करणे सतत करीत असतो. धर्माचरणाने तो कौटुंबिक विचारांपासून दूर असतो. असा माणूस मृत्युलोकीचा ब्रह्मदेव समजायला हवा. उन्हाळ्यात पाण्याची वाफ होते. तर पावसाळ्यात पाण्याचा वर्षाव झाला म्हणून सागराच्या मनात आनंद किंवा दु:ख विचार नसतो. तसे संकटात दु:ख आणि जय मिळाल्यावर आनंद स्थितप्रज्ञास होत नाही.
–प्रकाश पागनीस