राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

सत्तेची भाऊबंदकी!

जयंत माईणकर

सत्तेची भाऊबंदकी सध्या दोन भावात सुरू आहे. भाजप एका भावाच्या विरोधात आहे तर दुसर्‍या भावाला सध्या गरजेनुसार वापरून घेत आहे. पंचवीस तीस वर्षांपूर्वी हेच भाजपचे नेते एकाच वेळी दोन्ही बंधूंच्या मागे फिरायचे. कारण बाळासाहेबांशी बोलण्याची हिंमत स्व. प्रमोद महाजन वगळता कोणाही भाजप नेत्यात नव्हती.

अमेरिकेतील एक अग्रगण्य राजकीय परिवार म्हणून रॉकफेलरचे नाव घेतले जाते आणि असे म्हटले जाते की, अमेरिकेत डेमोक्रेटिक किंवा रिपब्लिकन कोणताही पक्ष सत्तेवर असो, या परिवाराचा कोणता ना कोणता प्रतिनिधी सत्तावर्तुळात असतोच. अर्थात ही व्यक्ती संपूर्ण परिवाराचे आर्थिक हितसंबंध योग्य राहतील याची काळजी घेत असते. काहीसा तोच प्रकार १९४८ पासून सिनेटपासून अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार्‍या केनेडी परिवाराचा आहे. मध्यंतरी या परिवाराचे जावई आणि सिनेअभिनेते अरनॉल्ड श्वार्झनेगर हे रिपब्लिकन पक्षाचे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर होते. भारतात हा प्रकार सुरू केला असेल तर सिंधिया परिवाराने.


एकेकाळी जनसंघ हा आर्थिक पाठिंब्याकरता अवलंबून असायचा. राजमाता विजयराजे सिंधिया यांच्यावर मात्र त्यांचे चिरंजीव स्व. माधवराव यांनी १९७७ साली काँग्रेसचा हात धरला. राजमातांच्या नंतर त्यांच्या दोन्ही मुली वसुंधराराजे आणि यशोधराराजे यांनी भाजपचीच कास धरली. मात्र माधवराव आणि त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य यांनी २०२० पर्यंत काँग्रेसची साथ सोडली नाही. अर्थात भाजप किंवा काँग्रेस कोणताही पक्ष सत्तेवर आला तरीही धनाढ्य सिंधिया परिवाराचे आर्थिक हितसंबंध जपले जातात.
राम मंदिर आंदोलनापासून देशात अघोषित द्विपक्षीय पद्धती सुरू असून, त्यापैकी एक पक्ष अर्थात काँग्रेस, तर दुसरा भाजप. काँग्रेसधार्जिण्या परिवारातील एक ना एक प्रतिनिधी आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न भाजपनेसुद्धा जाणीवपूर्वक केल्याचं दिसतं. नेहरू गांधी परिवारातील अरुण नेहरू, मनेका, वरुण गांधी, तसंच मोरारजी देसाई, लालबहादूर शास्त्री या माजी पंतप्रधानांचे नातू, चंद्रशेखर यांचे चिरंजीव, बिजू पटनायक यासारख्या क्षेत्रीय नेत्याचे नातेवाईक आज आपल्याला भाजपमध्ये आढळतात. यात त्या राजकीय परिवाराचा मुख्य फायदा असतो. सत्तेचं पारडं कोणाच्याही बाजूने झुकलं तरीही परिवाराची सत्ता अबाधित राहाते. आम्ही राजकीयदृष्ठ्या वेगळे असलो तरीही परिवार म्हणून एकच आहोत असं सांगायलाही मोकळे. भलेही यांचे कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडोत. परिवारात फूट पाडण्याच्या तथाकथित ’पुण्यकर्म’ करण्यात भाजप नेहमी आघाडीवर असतो. देशातील प्रत्येक राजकीय परिवारातील एक ना एक प्रतिनिधी आपल्या पंखाखाली घेण्याचा या संघ परिवाराचा प्रयत्न असतो. म्हणूनच की काय आजही अजित पवारांच्या बाबतीत भाजप फार ’सॉफ्ट’ राहतो. अर्थात याला कारण पहाटेचा देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आहे, असे मानण्यास हरकत नाही. या राजकीय परिवाराच्या फुटीच्या मांदियाळीत राज ठाकरे यांच्याकडे भाजपचं लक्ष केव्हापासून होतं.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासगीत उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरे युतीसाठी बरे हे सांगायचे आणि आज हा सगळा इतिहास सांगायचं कारण मशिदींवरील भोंग्यांपासून तर बाबरीपर्यंत ठाकरे परिवारातील हे दोन बंधू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. वास्तविक देशाच्या आर्थिक डबघाईच्या काळात आर्थिक प्रश्न सोडवावेत की, निरर्थक भावनिक प्रश्नांना हात घालावा हा एक प्रश्नच आहे. पण सत्तेसाठी बाबरीसारख्या प्रश्नाला हात घालून सुमारे दहा हजार लोकांचा बळी देऊन सत्ता प्राप्त करणार्‍या भाजपला याचं सोयरसुतक नाही. महाराष्ट्रासारखं आर्थिकदृष्ठ्या संपन्न राज्य शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा हात धरल्याने आपल्या हातून गेल्याचं दुःख भाजपच्या इतकं जिव्हारी झोंबलं आहे की, त्यांनी उद्धवविरुद्ध उभे केले आहे राज यांनाच. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद दिलं उद्धव ठाकरेंना, तर भाजपने त्यांच्याविरुद्ध तोफ डागली राज यांच्या रूपाने. पारिवारिक मामला. बाळासाहेबांचा खरा वारस मीच हे सांगण्यासाठी आणि त्या वारसातील थोडातरी भाग आपल्याला मिळावा यासाठी. बाबरी कोणी पाडली याचं व्हिडीओ फुटेज, फोटोग्राफ दिसत असताना आणि लाखो लोकांचा जनसमुदाय’ एक धक्का और दो, बाबरी को तोड दो’ म्हणत असताना कारसेवकांनी बाबरी पाडलीच नाही, असा भाजपने सुंदरसिंग भंडारी या आपल्या नेत्यामार्फत दावा करणे म्हणजे निव्वळ खोटं बोलण्याचा कळस म्हटला पाहिजे. त्यावेळी एका पत्रकाराने तुम्ही नाही तर शिवसैनिकांनी बाबरी पाडली का, असा प्रश्न विचारला. त्यावेळी असू शकतं, असं त्यांनी मोघम उत्तर दिलंं.

बाळासाहेबांनी त्याचा फायदा घेत जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे असं आंतरराष्ट्रीय स्तरावर वादग्रस्त ठरलेलं वाक्य म्हटलं. वास्तविक पाहता शिवसैनिकांचा बाबरी पाडण्याशी काहीही संबंध नव्हता. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह सर्व शिवसैनिक लखनऊला जाऊन परत आले होते. तेव्हा २२ वर्षांचे असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मीसुद्धा कारसेवेत होतो असा दावा आता करण्यात अर्थ नाही. कारण ६ डिसेंबर १९९२ ला तर कोणीही बाबरी विध्वंस प्रकरणाची जबादारी घेण्यास तयार नव्हते. आणि उद्धव ठाकरेंनी अगदी त्याच गोष्टीची जाणीव करून दिली आहे. सत्तेची भाऊबंदकी सध्या दोन भावांत सुरू आहे. भाजप एका भावाच्या विरोधात आहे, तर दुसर्‍या भावाला सध्या गरजेनुसार वापरून घेत आहे. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी हेच भाजपचे नेते एकाच वेळी दोन्ही बंधूंच्या मागे फिरायचे. कारण बाळासाहेबांशी बोलण्याची हिंमत स्व. प्रमोद महाजन वगळता कोणाही भाजप नेत्यात नव्हती. एकप्रकारे राज्यातील सत्तेचं समीकरण कसंही झालं तरीही त्यात ठाकरे परिवार हा कुठल्या ना कुठल्या सत्तेच्या जवळच्या स्थानावर राहणारच. आणि बाहेर कार्यकर्ते एकमेकांची कितीही डोकी फोडोत, परिवारातील सर्व कामे होणारच.भारतात सिंधिया परिवारापासून १९७७ साली सुरू केलेलं हे सत्तेचं नवीन समीकरण महाराष्ट्रातही अगदी तालुका जिल्ह्यातील राजकारणापासून राज्य स्तरावरील राजकारणापर्यंत दिसायला लागलेल आहे.


मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले तर यांची हातभर फाटली, अशा प्रकारचे माजी मुख्यमंत्र्यांना ’अशोभनीय’ शब्द देवेंद्र फडणवीस जाहीर सभेत बोलतात. सत्तेसाठी भाऊबंदकीच्या मागे लपून मशिदींवरील भोंग्यांपासून अनेक निरर्थक, पण भावनिक मुद्यांवर बोलणार्‍या भाजपचा कावा जनतेने ओळखावा! तूर्तास इतकेच!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये