सुनील देवधर यांना उमेदवारी?

पुणे लोकसभा मतदारसंघ; भाजपची चाचपणी सुरू
पुणे | Pune News – पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या वतीने सुनील देवधर (Sunil Deodhar) यांच्या नावाची चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सध्या सुनील देवधर यांना राष्ट्रीय कार्यकारिणीपासून दूर ठेवले असून, त्यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येणार आहे, असे सांगितले जात होते.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सुनील देवधर यांच्या नावाचा विचार सुरू आहे. त्यांच्या नावाबाबतची चाचणी सध्या पक्षश्रेष्ठी करीत आहेत. पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात येत असताना देवधर यांना मात्र महत्त्वाच्या जबाबदारीपासून दूर ठेवण्यात आले होते. त्याचवेळी याबाबतची चर्चा सुरू झाली होती. त्यावरूनच ते आगामी लोकसभेचे उमेदवार असतील असे ठरत होते. आता मात्र एका वरिष्ठ सूत्राने दैनिक राष्ट्रसंचारला याबाबत दुजोरा दिला आहे.
आता भाजपसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आणि खासदार भाजपमध्ये मित्र पक्ष बनल्याने भाजपच्या उमेदवाराची ताकद वाढली आहे. यापूर्वी मुरलीधर मोहोळ तसेच जगदीश मुळीक यांच्या नावाची चर्चा होती, परंतु विविध कारणांमुळे ही दोन्ही नावे आता मागे पडली आहेत. मुरलीधर मोहोळ हे कोथरूडच्या मर्यादा ओलांडून पूर्ण मतदारसंघामध्ये पोहोचू शकतील आणि त्या पद्धतीने त्यांची प्रतिमा उभी राहू शकेल का, याबाबतची चाचणी सुरू होती, परंतु अनेक अर्थाने मर्यादा आल्याने हे नाव तूर्तास मागे ठेवण्यात आले आहे.
जगदीश मुळीक यांच्या शहराध्यक्षपदाचा क्लेम बाजूला ठेवत सध्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे थोडेसे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यांच्या स्वतःच्याच होमपेजमध्ये काही परिस्थिती बदलली आहे. सुनील टिंगरे यांच्यासारखे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. त्यांना विधानसभेसाठी प्रोजेक्ट करावे का याबाबतदेखील विचार सुरू होता. त्यांचे एकूणच गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची असलेले सुसंबंध पाहता त्यांचे नाव पुढे होते, परंतु कुठल्यातरी सर्वेक्षणामुळे हे गणित बिघडल्याचे सांगितले जाते.
भाजपची विचारसरणी हिंदुत्व, ब्राह्मण्य यांना मानणारा वर्ग आणि पुन्हा अजित पवार यांच्या ग्रामीण भागातील साथ हा सर्वंकष विचार करून सुनील देवधर यांचे नाव पुढे येत असल्याचे एका वरिष्ठ सूत्राने दैनिक राष्ट्रसंचारशी बोलताना सांगितले.
सुनील देवधर हे भाजपचे राष्ट्रीय सचिव होते. यंदा त्यांना कार्यकारिणीत स्थान दिले नाही.
ब्राह्मणबहुल पुण्यातून लोकसभेत त्यांना उमेदवारी देण्याचा पक्ष विचार करत असल्याची चर्चा.
त्यांना यावेळी संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. म्हणून उमेदवारी मिळणार?