“भीक म्हणजे काय तर…”, फुले-आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण

मुंबई | Chandrakant Patil – भाजप नेते, आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान केलं होतं. त्यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर, चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच यावेळी त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, भीक म्हणजे काय तर आपण महापुरुषांच्या जयंतीसाठी किंवा वेगवेगळ्या उत्साहाच्या वेळी वर्गणी जमा करतो. त्यामुळे या भीक शब्दानं जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी एवढ्या छोट्या मनाचा माणूस नाही. माझ्या रक्ता-रक्तात आंबेडकर, महात्मा फुले हे आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्याबद्दल कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करण्यास माझी काहीही हरकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
काल (9 डिसेंबर) चंद्रकांत पाटील हे पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरकार त्या काळात शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांनी शाळा उघडल्या. आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या आहेत. सरकारनं या शाळा सुरू करताना त्यांना अनुदान दिलेलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरवून दाखवलं.
त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहे. तर औरंगाबादमध्ये देखील काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. मात्र, आता पाटलांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केल्यानं या प्रकरणावर पडदा पडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.