‘वेदांता’च्या दिव्याखालचा अंधार!
!['वेदांता'च्या दिव्याखालचा अंधार! Vedanta Faxconn](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/09/Vedanta-Faxconn-780x470.jpg)
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आणि एकच गहजब माजला. कोणी म्हणे हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश, तर कोणी म्हणे प्रकल्प एका रात्रीत जात नाही… त्यामुळे हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश! आरोपांच्या या कलगीतुऱ्यामध्ये प्रकल्प गेला , त्याचे शल्य मात्र पुण्याच्या लाखो बेरोजगार लोकांना कमालीचे डसले आहे.
आपल्या देशात प्रत्येक मुद्द्याचा कलगीतुरा रंगवायचा आणि त्यातून राजकीय – सामाजिक – प्रादेशिक अस्मितेचे कांगावे करायचे ही प्रथा पडली आहे. परंतु मूळ प्रकल्प का गेला? असे काय घडले, की ज्यामुळे महाराष्ट्र अशा प्रकल्पांचे स्वागत करू शकत नाही किंवा अशा प्रकल्पांसाठी महाराष्ट्र उद्योजकांना सुरक्षित वाटत नाही, याचा विचार आधी लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे आणि या लोकप्रतिनिधींच्या हाती आपल्या भवितव्याची सूत्रे देणाऱ्या सामान्य नागरिकांनीदेखील केला पाहिजे.
असे काय घडले, की ज्यामुळे महाराष्ट्रापेक्षा वेदांता-फॉक्सकॉन यांना गुजरात सुरक्षित वाटू लागला. कुठलाही उद्योजक सर्वप्रथम आपली सुरक्षितता पाहतो, त्यानंतर गुंतवणुकीचा परतावा पाहतो आणि हा परतावा मिळण्यासाठी आपला व्यवसाय सुरळीतपणे – विनासायास चालावा यासाठीची परिस्थिती आणि वातावरणदेखील पाहतो.
या सर्व आघाड्यांवर उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात नेमके कसे वातावरण होते, याचा जर आपण गांभीर्याने विचार केला तर वेदांता-फोक्सकॉन प्रकल्पाने महाराष्ट्राला टाळून गुजरातची वाट धरली, यात काहीही विशेष वाटण्याचे कारण नाही.
कारण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे हे सचिन वाजेसारख्या एका खंडणीबहाद्दराचे वकीलपत्र घेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कुप्रवृत्तीचा झेंडा नाचवत होते. राजकारणातील सदसद्विवेक बुद्धी ज्याची जिवंत आहे अशा प्रत्येक माणसाला शरमेने मान खाली घालावी वाटेल , इतके उद्धव ठाकरे यांचे वर्तन हे अयोग्य आणि निलाजरेपणाचे होते.
‘सचिन वाझे म्हणजे लादेन आहे काय?’ असे त्यांचे वक्तव्य होते. गुन्हेगारीच्या विरोधात लढणाऱ्या प्रत्येकाची मान शरमेने खाली जावी असे ते वक्तव्य होते . यापूर्वीपासूनच शिवसेना आणि मातोश्री हे खंडणीबहाद्दरांचे आश्रयस्थान आहे, असे आरोप होत होते. मातोश्रीचा वाटा – मातोश्रीचा हिस्सा – मातोश्रीची दहशत हे शब्दप्रयोग राजकारणात छुपेपणाने का होईना सर्रास वापरले जातात. मातोश्रीचा दरारा हा केवळ लाखो शिवसैनिकांच्या गर्दीवरती नाही तर त्यांना अनेक कंगोऱ्यांतून जमलेल्या अर्थकारणाशीदेखील निगडित आहे.
या अर्थकारणाच्या माध्यमातून काहींना सुरक्षितता जरूर मिळाली परंतु अनेक जण उघड्यावर देखील आले, हे नाकारून चालणार नाही. वेदांतासारख्या केवळ गुंतवणूक आणि त्यातून नफेबाजी हा दृष्टिकोन असणाऱ्या प्रकल्पांना हे सगळे राजकीय सोपस्कार परवडणारे नाहीत. प्रामाणिकपणे व्यापारउदिम करून प्रकल्पांच्या दिशा – अर्थकारणाच्या मोठमोठ्या उंचीवर नेण्याचे स्वप्न बघणारा उद्योजक हा अशा राजकीय तडजोडीच्ा किंवा ब्लॅकमेलिंगच्या प्रचंड तिटकारा आणि तिरस्कार करणारा असतो.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवली आणि त्याबाबत शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादीचा कुठलाही लोकप्रतिनिधी, नेता उद्योजकतेच्या सहानुभूतीने बोलला नव्हता. त्यापेक्षा स्फोटके ठेवली हे खरे की खोटे, तो सापळा होता, की कोणाला बदनाम करण्याचे षड्यंत्र ? यातच राजकीय कलगीतुरा रंगला होता. परंतु अर्थ-उद्योगाच्या माध्यमातून साम्राज्य निर्माण करणाऱ्यांची इतकी असुरक्षितता… तीदेखील सरकारी पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याच्या षड्यंत्राच्या चर्चा जर होत असतील तर कुठल्या उद्योजकाला हे सुरक्षिततेचे वाटेल?
ज्या पोलीस दलाचा चेहरा म्हणून परमवीरसिंह यांना क्लीन चीट दिली जात होती. त्यांना राष्ट्रीय तपास एजन्सीने कुठे नेले, हा इतिहास सर्वश्रुत आहे. म्हणजे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद मिरवत असणाऱ्या पोलीस प्रशासनाचीच जर ‘खलांना सुरक्षा’ असेल, तर उद्योजकता येथे सुरक्षित राहील का? आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तो विश्वास तरी राहील का, ही विचार करायला लावणारी परिस्थिती आहे. वेदांता-फॉक्सकॉनने हा विचार का केला असू नये?
मनसुख हिरेन गायब झाला? कोण होता तो? कुठल्या टोळीचा – गॅंगवॉरचा घटक होता, की कुठला राजकारणी होता? मनसुख हिरेन हा हिऱ्यांचा व्यापारी होता. व्यापारी – उद्योजक जिथे इतके असुरक्षित आहेत, राजकीय वळणे इतकी हेलकावे खाणारी आहेत, तिथे कुठल्याही मोठ्या उद्योजकाला सुरक्षितता वाटावी अशी परिस्थिती आहे का ? याचा महाराष्ट्रीय म्हणून आपण विचार केला पाहिजे.
दौंड , मंचरपासून ते मुळशीपर्यंतच्या खोऱ्यामध्ये राजकीय दादा लोकांच्या एनओसीशिवाय उद्योग उभारता येत नाही. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील सुस्थितीत चालणाऱ्या कॉर्पोरेट कंपनीचे घोडे मातोश्रीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाही. अशा विचारसरणीचे अधिकारी आणि राजकीय दलालांनी ही मुंबई आणि महाराष्ट्र भरला आहे.
अशा स्थितीत रेड कार्पेट घालणारी २३ राज्ये असताना महाराष्ट्रात एवढा मोठा धोका पत्करून कोण गुंतवणूक थाटेल? कोण उद्योग उभारण्याकरता धजावेल, याचा विचार केला पाहिजे . येथे येणारे उद्योजक हे केवळ राजकीय पंखा-श्रेयाखाली वाढणारे आहेत. एका प्रामाणिक , रोजगार निर्माण करणाऱ्या पारदर्शक उद्योजकतेला येथे काहीच भाव नाही का, हादेखील विचार आपल्याला आत्मपरीक्षण करून करावा लागेल ?
महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते वेदांता-फॉक्सकॉनला हा विश्वास द्यायला कमी पडले किंवा कदाचित त्यांना त्रास होईल, असेदेखील वर्तन घडले असावे . या सगळ्यांचा परिपाक म्हणून हा प्रकल्प गुजरातकडे नेण्यात अग्रवाल यांना अधिक सुरक्षितता वाटली, हे नितळ आकाशाइतके स्वच्छ सत्य आहे .
त्यामुळे राजकीय , प्रादेशिक, भाषिक अस्मितेच्या नावाने गळे काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही. त्यापेक्षा आपण या महाराष्ट्राचे कसे वाटोळे करत आहोत आणि उद्योगशीलतेला प्रोत्साहन देण्याऐवजी धोकादायक परिस्थिती कशी निर्माण करत आहोत त्याचा विचार या नतद्रष्ट मंडळींनी केला पाहिजे.