भटकंती आडवाटेचीलेखसंडे फिचर

हॅट्स ॲाफ टू समीरा!!

_©रश्मी लाहोटी |

थोडेफार चढउतार असलेलं आपलं आयुष्य, पण थोडंसं आखलेल्या रेषेच्या बाहेर गेलं, की आपण परेशान होतो. उदास होतो, घाबरून सगळे प्रयत्नच सोडून देतो. नशिबाला दोष देऊन व्हिक्टिम कार्ड खेळतो. पण एखाद्याचं आयुष्य किती किचकट आणि त्रासांनी भरलेलं असतं, तरी ते खंबीरपणे लढत असतात आणि आयुष्याची परीक्षा उत्तमरीत्या उत्तीर्ण होतात. समीरा, बारावी शिकलेली मेहनती मुलगी. बारावी झाली, की लग्न लागलं. एक बाळ झालं. नवऱ्याचं दारूचं व्यसन, रोजची मारझोड, शेवटी कंटाळून फारकत! माहेरी चार दिवस सुखाचे गेले.

भाऊ-भावजयीपुढे आई-वडीलही हतबल ठरले. रोजच कटकटी होऊ लागल्या. अशातच माहेरपणाला आलेली बालपणीची मैत्रीण भेटली. तिचा दूरच्या नात्यातला दीर होता, बायकोपासून विभक्त राहणारा. दोघांनाही साथीदाराची गरज होतीच. दोघांचं लग्न ठरवण्यात मैत्रीण यशस्वी झाली. मदतीच्या बुरख्याआड स्वतःचा स्वार्थ साधला. दोन्हीकडची अर्धवट माहिती एकमेकांना दिली, बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी जाणीवपूर्वक लपवल्या. ‘आजकाल मुली मिळत नाहीत म्हणून’ दीराकडून समीराच्या आई-वडिलांना पैसे द्यावे लागतील असे सांगून सगळे स्वतःच पचवले. ‘पहिल्या मुलाबद्दल स्पष्ट सांगितलंय’ हे समीराच्या घरी सांगितलं, पण दीरापासून लपवलं.

लग्नानंतर पाच-सहा महिन्यांतच सगळा उलगडा झाला. पती-पत्नीत वाद झाले, बरेच वाढले. आरोप-प्रत्यारोपही झाले. मैत्रिणीसोबतही बेबनाव झाला, खरं-खोटं झाल्यावर. कालांतराने मुलगा झाला. काही कारणाने सात दिवसांत वारला. ‘पहिल्या मुलाला पतीने आणलं नाही म्हणून समीरानेच बाळाकडे जाणूनबूजून दुर्लक्ष केले’ अशी अफवा चिडलेल्या मैत्रिणीने उठवली. परत नवरा-बायकोचे संबंध बिघडले. धूसफूस वाढत होती आणि परत विभक्त रहायची वेळ आली.

या वेळेस मात्र समीरा खंबीर होती. माहेरी जाऊन परत तेच पाढे गिरवायची तिची अजिबात इच्छा नव्हती. मुलाला घेऊन वेगळी खोली करून राहिली. स्वबळावर चहाच्या गाडीपासून झालेली सुरुवात आज एका कॅफेमधे रूपांतरीत झाली होती. ठीकठाक बचतही झाली होती. मुलगा इंजिनिअर होत होता. किती तरी संकटं आली असतील; आर्थिक, सामाजिक अन् भावनिक! पण सगळ्यांना परतवून लावण्यात समीरा यशस्वी झाली. समीराकडे पाहून वाटतं, किती वाईट वेळ आली तिच्यावर! पण आज ती ज्या जिद्दीने उभी आहे ते पाहता वाटतं, खरंच एखादी वेळ, वाईट वेळ असते का? का फक्त अनुकूल आणि प्रतिकूल अशी परिस्थितीच असते फक्त?

अनुकूल परिस्थितीला आपण चांगली वेळ समजतो आणि प्रतिकूल परिस्थितीला वाईट वेळ एखाद्यावर ओढावलेली ! परिस्थती अनुकूल असेल, तर सगळं कसं आखीवरेखीव, व्यवस्थित चालणारं लयबद्ध जीवन असतं. काही ताणतणाव नाही, कशासाठी लढणं, झगडणं नाही, की काही मोठं, वेगळं हस्तगत करण्याची इच्छाही नाही. सगळं कसं एकसुरी, संथ, शांत भासणारं! पण जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते, वेळ वाईट असते तेव्हा झगडावं लागतं, विशेष मेहनत घ्यावी लागते त्यातून बाहेर पडण्यासाठी. कितीतरी चॅलेन्जेस स्वीकारावे लागतात, होणारे विरोध, अपमान पचवावे लागतात. सजगतेने निश्चयपूर्वक आणि मेहनतीने कठीण वेळही हळूहळू का होईना चांगल्यात रूपांतरीत होते, जशी समीराची झाली. आपल्याला घडवते, जिद्द आणि मेहनत शिकवते.

आलेल्या वाईट वेळेचा आपण सामना कसा करतो त्यावरच ती वेळ तशीच राहील की बदलेल हे ठरत असतं. काही जण नशिबाला दोष देत बसतात, प्रयत्न न करता आहे ती परिस्थिती स्वीकारतात, तर काही समीरासारखे स्वतःही कणखर होतात आणि प्रतिकूलतेला अनुकूलतेत बदलण्यास भाग पाडतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये