लेखसंपादकीय

विवाह विधी : एक पवित्र संस्कार

’मुलासम मुलगी समान नारी… प्रकाश देते दोन्ही घरी’’

विवाह हा एक समाजमान्य संस्कार आहे. दोन जीवांचे मनोमिलन म्हणजे विवाह होय. विवाह करणे सर्वांना मान्य असले तरी शासनाने वयाची मर्यादा राखून ठेवलेली आहे. बालविवाह पद्धती रद्द होण्यासाठी व सांसारिक व्यवस्था सांभाळण्यायोग्य होण्यासाठी वयाची अट ठेवलेली आहे. स्वातंत्र्यापूर्वी बालविवाह पद्धत अधिकच रूढ झाली होती. त्यामुळे छोट्या वयातच गर्भधारणा होत असल्याने नाहक बळी दिल्यासारखे होत होते. त्यामुळे मुलींचे वय १८ व मुलांचे वय २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच विवाह करण्याची कायदेशीर परवानगी मिळत असते.महर्षी धोंडो केशव कर्वे, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय या समाज सुधारकांनी विधवा विवाह, केशवपन, बालविवाह या अनिष्ट प्रथांना आळा बसावा यासाठी प्रयत्न केले. विवाहाची ही प्रथा आपल्या देशात एक संस्कार म्हणूनच प्रचलित झालेली आहे.

प्रत्येक जिवाला आपल्यासारखा जीव निर्माण करण्यासाठी विवाह अत्यंत आवश्यक बाब आहे. लग्न करणे म्हणजे सांसारिक दोन चाकच म्हणता येईल. एकमेकांचे सुख-दु:ख, भावभावना, इच्छा, मते व्यक्त करण्याचे माध्यम आहे. शारीरिक, मानसिक सुख साध्य करण्यासाठी सामाजिक मान्यता मिळणारा संस्कार होय. सांसारिक सुख आणि त्यांच्या प्रेमाचा तुकडा म्हणजे उमलून आलेली फुले होय. समागम प्रक्रिया सर्व जिवांना गरजेची बाब आहे. माणसाप्रमाणे इतर जिवात विवाह संस्कार नाहीच. विदेशात देखील भारतातील विवाह संस्कृती ही योग्य असल्याचे प्रतिपादन केलेले आहे. विवाह संस्कार ही पद्धत असल्याने बलात्कार, विनयभंग यासारखे विघातक कृत्याला आळा घालता येतो.

पूर्वी साधने नसल्याने फार लांबची मुलगी न बघता जवळच सोयरकी केल्या जात होत्या. एकमेकांशी आपुलकीचे नाते निर्माण व्हायचे. हल्ली काळ बदललेला आहे, दळणवळणाची साधने उपलब्ध झालेली आहे. गावाशेजारचे वर, वधू न बघता दूर अंतरावरील बघितले जातात. दोन वेगवेगळ्या कुटुंबात वास्तव्य करून वराच्या घरी जन्मभरापर्यंतचे नाते निर्माण करीत असते त्यामुळे ’’मुलासम मुलगी समान नारी… प्रकाश देते दोन्ही घरी’’. दोन्ही कुटुंबांचा उद्धार आजच्या मुलींच्या हातून घडत आहे. मुलगा-मुलगी यात कोणताही भेद न करता मुलगी जन्माला घालावे. गर्भलिंग निदान चाचणी करून कायद्याने गुन्हा असून, भ्रूणहत्या थांबवायला हवी. तेव्हाच विवाहासाठी मुली मिळेल अन्यथा विवाहासाठी मुली मिळणे कठीण होत आहे.

आई-वडील व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या साक्षीने विवाहाची पूर्ण प्रक्रिया पार पाडीत असे. अरेंज मॅरेज केले जात होते. जन्मदात्यांनी ठरविलेली वर वा वधू पक्षाचा विचार करीत होते. मोठ्या व्यक्तींचा आदर प्राधान्याने केला जात होता, पण सध्याची परिस्थिती बघता लव्ह मॅरेजचा ससेमिरा अधिकच फोफावलेला दिसून येत आहे. प्रेमाच्या झुल्यात आनंदात, समाधानात वावरत असताना एकमेकांचा आदर कमी होत जाऊन भांडण निर्माण होत आहे. छोट्या-छोट्या भांडणाचे रूपांतर घटस्फोटात होत आहे. त्यामुळे लव मॅरेजच्या भानगडीत न पडता अॅरेंज मॅरेज करण्यात यावे. लव मॅरेजचे काही वर्षे संसार केल्यानंतर वाद निर्माण होऊन ‘घटस्फोट’ ही टोकाची भूमिका घ्यावी लागत आहे. विवाह विधी हा सोईस्कर संस्कार उत्कृष्टरीत्या पार पाडण्यासाठी समजूतदारपणा आवश्यक आहे.

आपल्या मुलांना सोडून इतर जोडीदार निवडणे म्हणजे भविष्याशी खेळ खेळणे होय. म्हणूनच पती-पत्नीमधील वाद विकोपाला जाऊ न देता सामंजस्य राखणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी एकत्र कुटुंबात राहून नात्यातील गोडवा चाखायला मिळत होता, पण सध्या एकत्र कुटुंब पद्धतीची जागा विभक्त कुटुंब पद्धतीने घेतल्याने संस्काराची भर पडत नाही तर भार समजत आहेत. सासू-सासरे, आई-वडील यांना नकोसे असल्याने अलग राहाणे पसंत करीत आहेत.

दोन जिवांच्या मिलनासमवेत विविध नाते निर्माण करणारी विवाह संस्था अस्तित्वात आहे. आजी-आजोबा, काका-काकू, मामा, मावशी यासारखे विविध नाते निर्माण होत असतात. विवाह ही संकल्पना व्यापक असून, सार्वकालिक झालेली आहे. भ्रूणहत्या याच गतीने होत असल्यास विवाह संस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून विवाहित तरुणांनी मुलगा-मुलगी यात कोणताही भेद न करता मुलीला योग्य शिक्षण देऊन समतेच्या पायरीवर उभे करायला हवे. भारतीय संविधानाने दिलेले स्त्री-पुरुष समानतेचा मूल्य प्रत्यक्ष अंमलबजावणीत येण्यासाठी सर्व क्षेत्रात मुलींना संधी दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी भेदाभेद न पाळता समतेचा आवाज बुलंद करण्यासाठी व विवाह संस्कार सुरळीत चालण्यासाठी मुलींना जन्माला घालावे. आपल्याला बहीण, मावशी, आत्या, आई पाहिजे, मग मुलगी का नको, हा प्रश्न स्वत:ला विचारावा आणि विवाह विधी असलेला संस्कार सातत्याने टिकून राहावा, यासाठी प्रत्येकाने विचार करायला हवा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये