ही बी हार…!

या प्रकारच्या परिस्थितीला वारंवार सामोरे जावे लागू नये, यासाठी भाजपला प्रादेशिक पक्ष कमी महत्त्वाचे करायचे आहेत; नगण्य करायचे आहेत. काँग्रेसमुक्त भारत म्हणत काँग्रेस शिल्लक ठेवायचा आहे. राज्याराज्यातले टोचणारे खिळे आता भाजपला नको आहेत. मात्र राज्याराज्यांत सुरू असलेल्या या अस्वस्थेतेचे मोल सर्वसामान्य जनता सोसत आहे. हिडीस राजकारणाला सोसत आहे. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिधींकडून जनतेची, मतदारांची ही बी हार आहे, हे नक्की.
अखेर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षाला गुंगारा देत अजून एक कोलांटउडी मारली. तसे नितीशकुमार कोलांटउड्या मारण्यात हुशार आणि माहीर आहेत. आपले गुरु जयप्रकाश नारायण यांनी न शिकवलेल्या अनेक कला त्यांनी संपादन केल्या आणि त्यात ते पारंगत झाले. त्यातली एक सत्ता सोडायची नाही, त्यासाठी काही करायचे झाले तरी चालेल हा त्यांचा मूलमंत्र आहे. त्याचे परिणाम म्हणजे ते आता आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. खरे तर बिहारमध्ये २०२० मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यात नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता. निवडणुकीपूर्वी त्यांना लालूप्रसाद यादव यांचे भय होते. त्यापुढे आपण स्वतंत्र लढलो तर आपला टिकाव लागणार नाही, असे पक्के चित्र होते. साहजिकच एक कोलांटी मारून त्यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली. त्यावेळच्या निकालावर नजर टाकली तर लालुंच्या आरजेडीला ७५ जागा होत्या. भाजपला ७४ जागा होत्या, तर नितीशकुमार यांना केवळ ४३ जागा मिळवता आल्या होत्या. कोणाच्या तरी ओंजळीने पाणी प्यावे लागणार, हे नक्की होते आणि आजही आहे. साधनशुचिता, कोर्ट निकाल आणि चौकशीचा फेरा बाजूला केला तर उद्या आरजेडी आणि भाजप एकत्र आले तर… मात्र सध्या तसे होणार नाही आणि नितीशकुमार यांना कोणी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून हटवू शकत नाही. नितीशकुमार आणि भाजप हीसुद्धा नैसर्गिक उटी नव्हती.
आज ना उद्या ती संपणार होती. मात्र तात्पुरत्या सोयीसाठी आणि तेजस्वी यादवला रोखण्यासाठी नितीशकुमार यांनी केलेली ही तडजोड सत्ताविकृत मनोवृत्ताचे द्योतक आहे. इथे नितीशकुमार असेल बाकी ठिकाणी इतर पक्ष असतील. निवडून एकाबरोबर लढायची आणि सत्तेसाठी दुसऱ्याबरोबर घरोबा करायचा, हा प्रकार आता रूढ करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.
नितीशकुमार यांनी मारलेल्या या कोलांटउडीने महाराष्ट्राच्या राजकारणातील विरोधी पक्ष आणि विचारधारा असणाऱ्यांची परिस्थिती अवघड करून ठेवली आहे. नितीशकुमार बरोबर वागले असे म्हणावे, तर भाजप महाराष्ट्रात योग्य वागले, असे म्हणावे लागेल. जर राज्यात भाजप अयोग्य वागला, सत्तेसाठी भुकेला आहे म्हणावे तर नितीशबरोबर काँग्रेस पण बिहारमध्ये पाट लावून आहे. नितीशकुमार सत्तेसाठी भुकेलेले आहेत, असे म्हणावे लागेल आणि यात मांडवली करण्यात काँग्रेसही आहे. विधानसभेचे अध्यक्षपद विधानसभेत केवळ १९ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला पाहिजे, यावरून ते सिद्ध होते. याशिवाय नितीश-भाजपच्याबरोबर असणाऱ्या आठ जणांनाही काही ना काही पाहिजेच आहे.
अशावेळी महाराष्ट्रात जे झाले ते चूक आणि बिहारमध्ये बरोबर हे होऊ शकत नाही. आम्ही वारंवार राष्ट्रसंचारच्या अग्रलेखातून राजकारणी स्नानगृहात विवस्त्र असतात हे मान्य आहे, पण कसे विवस्त्र असतो, हे स्नानगृहाबाहेर येऊन का दाखवता हा सवाल केला होता. ती परिस्थिती ही मंडळी अधोरेखित करीत आहेत. सरतेशेवटी आम्ही वारंवार म्हणतो त्याप्रमाणे या प्रकारच्या परिस्थितीला वारंवार सामोरे जावे लागू नये, यासाठी भाजपला प्रादेशिक पक्ष कमी महत्त्वाचे करायचे आहेत. नगण्य करायचे आहेत. काँग्रेसमुक्त भारत म्हणत काँग्रेस शिल्लक ठेवायचा आहे. राज्याराज्यातले टोचणारे खिळे आता भाजपला नको आहेत. मात्र राज्याराज्यांत सुरू असलेल्या या अस्वस्थेतेचे मोल सर्वसामान्य जनता सोसत आहे. हिडीस राजकारणाला सोसत आहे. आपण निवडून दिलेल्या लोकप्रिनीधींकडून जनतेची, मतदारांची ही हार आहे हे नक्की.