डाॅ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल; डाॅक्टरांनी प्रकृतीसंदर्भात दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
![डाॅ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल; डाॅक्टरांनी प्रकृतीसंदर्भात दिली 'ही' महत्त्वाची माहिती prakash amte](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/prakash-amte-780x470.jpg)
पुणे | Dr. Prakash Amte Hospitalised – ज्येष्ठ समाजसेवक डॅा. प्रकाश आमटे यांना ८ जून रोजी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांना ल्युकेमियाचा त्रास असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यात ८ जून रोजी डॅा. प्रकाश आमटे हे पुण्यातील बी. जे. मेडिकल कॅालेजमध्ये दीक्षांत समारंभासाठी आले असताना त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यावेळी त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आता त्यांना हेअरी सेल ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर असल्याचं वृत्त आहे. डॉ प्रकाश बाबा आमटे यांना न्यूमोनियाची सुद्धा लागण झाली आहे. तसंच सध्या त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉ. प्रकाश आमटे हे पद्मश्री विजेते बाबा आमटे यांचे सुपुत्र आहेत. तसंच ते गेल्या ४९ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे महारोगी सेवा समितीच्या “लोकबिरादरी प्रकल्प” या नावाने आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवत आहेत. भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी असलेले प्रकाश आमटे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॅमन मॅगेसेसे, मदर तेरेसा पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्याचबरोबर २०१४ मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित डॉ. प्रकाश आमटे: द रिअल हीरो हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता.
दरम्यान डॉ. प्रकाश आमटे यांचा मुलगा अनिकेत आमटे यांनी फेसबुकवर पोस्ट करत अधिकची माहिती दिली आहे. “डाॅ. प्रकाश आमटे हे 8 जून रोजी पुणे येथे बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभाला आले असता त्यांना जास्त ताप व खोकल्याचा त्रास झाला म्हणून त्यांच्या एका खासगी रुग्णालयात उपचार व तपासण्या सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांना फोन/मेसेज करू नये तसेच भेटायला येऊ नये असं देखील ते म्हणाले आहेत.