Top 5ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

मेट्रोच्या विनाकारण बॅरिकेट्समुळेच कोंडी! मनपा आणि पोलिस आयुक्तांच्या संयुक्त पाहणीतील निष्कर्ष

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे : मेट्रोने शहरात ठिकठिकाणी लावलेल्या बॅरिकेटिंगमुळे वाहतूक संथ होत असल्याने कोंडी होते. अनेक ठिकाणी आवश्यकता नसतानाही मेट्रोकडून बॅरिकेटिंग केल्याने कारवाई का करू नये, याचा खुलासा मेट्रोकडून मागविण्याचा निर्णय महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पाहणी दौऱ्यात घेण्यात आला.

शहरातील प्रकल्पांच्या कामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी पालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज शहरातील विविध मार्गांची पाहाणी केली. ‘ऑन द स्पॉट’ सूचना केल्या. काम सुरू असल्याशिवाय कुठल्याही रस्त्यांवर बॅरीकेटींग करून रस्ते अडविणाऱ्या संबंधित ठेकेदार कंपन्यांविरोधात दंडात्मक कारवाईचे आदेश दिले.पावसाळ्याच्या सुरुवातीपासून शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत होती. चोवीस तास पाणी पुरवठा योजना व अन्य सेवा वाहिन्यांसाठीच्या खोदाईमुळे रस्ते खड्डेमय झाल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत पुणे शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी भेट देउन वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानुसार उपस्थित अधिकाऱ्यांना उपाय योजनांबाबत सूचनाही दिल्या.
गुप्ता यांनी सकाळी खराडी आणि जेल रोड परिसरातील रस्त्यांवर पाहणी केली. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत गणेश रस्त्यावरील गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीक, विद्यापीठ चौक, बाणेर, चांदणी चौक, नवले पूल आणि सिंहगड रस्ता परिसरातील मेट्रो उड्डाणपूल भागात पाहाणी केली. गणेशखिंड रस्त्यावर दुमजली उड्डाणपुलासाठी पायलिंगचे काम सुरू होईपर्यत विद्यापीठ चौकातून जवाहर चौकात यू टर्न घेऊन सेनापती बापट रस्त्याकडे जाण्याचा रस्ता खुला करण्याची सूचना केल्याने टाटा कंपनीने हा रस्ता खुला केला. याठिकाणी पायलिंगचे काम सुरू झाल्यानंतर हा रस्ता बंद करण्यात येईल. मॉर्डन शाळेच्या मैदानातून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

मेट्रोने पिलर उभारणीचे काम पूर्ण केले आहे. परंतु, पुढील कामास अवधी आहे. तेथील बॅरीकेट्स काढण्याच्या सूचना केल्या. दोन महिन्यांहून अधिक काळ काम बंद असतानाही बॅरीकेड्स लावल्याचे आढळल्यास ठेकेदारांवर कारवाईचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले. चांदणी चौकातील कामही जून २०२३ अखेर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. याप्रसंगी पालिकेचे मुख्य प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ विभागाचे प्रमुख व्हि. जी. कुलकर्णी, अतिक्रमचे प्रमुख माधव जगताप, वाहतूक शाखेच्या प्रभारी भाग्यश्री नवटके, वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये