देश - विदेशरणधुमाळीसंडे फिचर

‘आप’भी राजकारणी

असे म्हणतात, लोकशाहीमध्ये आलेले सरकार हे लोकांच्या लायकीप्रमाणे असते आणि आलेले सरकार हीच त्यांची लायकी असते. कधी काळी केवळ भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’सारख्या आंदोलनातून थेट मुख्यमंत्री बनलेले दिल्लीचे मुख्यमंत्री. अरविंद केजरीवाल यांना आपण अण्णा हजारे आंदोलनापासून जास्त ओळखतो. सोशल मीडियाचा अतिशय विस्तृत आणि योग्य वापर करून आणि सत्ताधाऱ्यांच्या चुकांवर, भ्रष्टाचारावर काम करून आणि विकासाचे एक मॉडेल तयार करून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनात केजरीवाल यांचा खूप महत्त्वाचा रोल होता, हे पूर्ण देशाने पाहिलेले आहे. त्यानंतर त्यांनी ‘आम आदमी पार्टी’ची स्थापना केली आणि दिल्लीमधील पहिल्याच निवडणुकीत शीला दीक्षित सरकार पाडले. त्यानंतर ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आणि सामान्य माणसासाठी काम करायला सुरुवात केली. त्यांनी केलेले शाळा, हॉस्पिटल, लाईट, पाणी हे सामान्य माणसाचे मूलभूत प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे हाताळून भ्रष्टाचारावर आला घालण्याचे काम देखील केले. परिणामी देशभर पसरलेला भाजप मोदी-शहा राहत असलेल्या दिल्लीत अगदी नगण्य ठरला. कॅगच्या (Comptroller and Auditor General of India) रिपोर्टमध्ये केजरीवाल सरकारच्या कामावर अतिशय चांगले रिपोर्ट नोंदवले गेले आहेत.

केजरीवाल सरकार हे मूळ चळवळीशी नाते सांगून स्थापन झालेले सरकार आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस दिल्ली सरकारच्या अखत्यारित यावे म्हणून केलेले आंदोलन असो, की नायब राज्यपाल यांच्यासोबत झालेले वाद असोत; सत्तेत असताना देखील प्रशासकीय कामकाजात आंदोलनाचा पवित्र घेऊन आम्ही मूळ आंदोलक आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यात केजरीवालांना कधी यशदेखील आले. राजकारणात अगदी नवखे असताना थेट मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन केजरीवाल यांनी मतदारांचा रोषदेखील पत्करून घेतला होता.

परंतु जसजसे ते राजकारणात स्थिरावले तसतसे राजकीय गणितात पक्के होत त्यांनी आपणदेखील पक्के राजकारणी आहोत, हे दाखवायला सुरवात केली. शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्यापासून ते पंजाबमध्ये सरकार आल्यावर भगतसिंग यांच्या गावात शपथविधी घेण्याबाबतच्या राजकीय खेळ्या खेळताना ते दिसू लागले. एकदा राजकारणात उतरल्यावर आपल्याला उपयोगी कुठल्याही गोष्टीचा ‘वापर’ करून सत्ता मिळवली पाहिजे हे त्यांनी जाणले आहे हे त्यांच्या देहबोलीतून आता नेहमी प्रकट होत असते.

आता गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी भाजपला नाकारले जात आहे किंवा नाकारले जाण्याची शक्यता आहे, त्या त्या ठिकाणी काँग्रेसला पर्याय म्हणून ‘आप’ स्वत: पुढे होत आहे. गुजरात निवडणूक आणि दिवाळीचे लक्ष्मीपूजन याचा अतिशय योग्य वेळ साधून केजरीवाल यांनी एक मागणी केली. नोटेवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापावेत असे पत्र पंतप्रधानांना पाठवले आहे.

त्या पत्रात ते म्हणतात- देशाच्या एकशे तीस कोटी लोकांची इच्छा आहे, की गांधीजींच्या फोटोसोबत नोटेवर लक्ष्मी आणि गणपतीचादेखील फोटो छापला जावा. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की आपल्या देशाची अर्थव्यवस्था अतिशय खराब झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत चाललेला आहे आणि त्यामुळे देशातील गरिबांची स्थिती नाजूक झाली आहे. यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्न तेव्हाच सफल होतात जेव्हा अशा प्रयत्नांना देवी-देवतांचा आशीर्वाद असताे. ते पुढे म्हणतात, जे व्यापारी असतात ते स्वत:च्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती असते आणि हे लोक त्याची पूजा करतात. जर भारतीय नोटेवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावला, तर पूर्ण देशाला त्यांचे आशीर्वाद मिळतील.
अरविंद केजरीवाल यांनी असे सर्व मुद्दे मांडल्यानंतर त्यांच्या या मुद्द्यावर चर्चा सुरू झाल्या आणि पुन्हा केजरीवाल राजकारणात किती समरस झाले आहेत, हे स्पष्ट झाले.

गुजरात हे व्यापारी राज्य म्हणून ओळखले जाते. गणपती आणि लक्ष्मी हे त्यांचे श्रद्धास्थान आहे. तिथला व्यापारी हा बऱ्यापैकी सत्तेवर पकड असलेला वर्ग आहे. तसेच गुजरातमध्ये गेल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळ भाजपची सत्ता आहे. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो. भाजपने देखील स्वत:ची तीच ओळख आहे, हे स्पष्ट केलेले आहेच. मग असे देवी-देवतांच्या बाबतीत मत मांडल्याने गुजरातमधील व्यापारी आणि हिंदू मते भाजपपासून दूर करून स्वत:च्या पक्षाला मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वाढती महागाई आणि ढासळता रुपया यामुळे तोच मुद्दा पकडून केजरीवाल आता धार्मिक राजकारण देखील करू लागले आहेत, हेच यामुळे अधोरेखित होते. हे केवळ केजरीवाल यांनीच केले आहे का ? तर नाही. याआधी मी जानवे घालणारा हिंदू आहे असे सांगून राहुल गांधींनीदेखील असा प्रयत्न केलेला आहे.

राजकारणात कुणी काय मुद्दा वापरावा हा त्या त्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपण जो मुद्दा मांडत आहोत तो आपल्या स्वतःच्या प्रतिमेशी संबंधित हवा निदान एवढी तरी जाणीव नेत्यांनी ठेवायला हवी. केजरीवाल ज्या वेळी हे सगळे मुद्दे मांडत होते तेव्हा त्यांच्या पाठीमागे दोन फोटो लावलेले दिसत आहेत. एक होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि दुसरा आहे भगतसिंग यांचा. डॉ. आंबेडकर यांनी बावीस प्रतिज्ञेत काय लिहिलेले आहे हे केजरीवाल यांना कदाचित माहिती नसेल आणि स्वतः भगतसिंग हे नास्तिक होते याचा त्यांना विसर पडलेला असेल. बर ज्या भाजपवर ते आजपर्यंत धार्मिक राजकारण करते म्हणून टीका करत होते. आज त्यांचेच मुद्दे केजरीवाल वापरत आहेत. ही इतकी हतबलता का आली असेल?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये