शोधा नात्यांमधला ओलावा…
![शोधा नात्यांमधला ओलावा... Freindsshipday](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/Freindsshipday-.jpg)
प्रत्येकाशी तुमचे पटतेच असे नाही. न पटणाऱ्या लोकांशी आपण कायम अंतर राखून राहतो. त्यांना जेवढ्यास तेवढे ठेवतोदेखील. पण जिथे आयुष्याचा फार मोठा काळ एकत्र घालवूनदेखील एखाद्या किरकोळ कारणामुळे नाती तोडण्यात कसला असुरी आनंद मिळत असेल लोकांना. नाती जपण्यात, सांभाळण्यात खरी मजा असते. कुठल्या तरी थुक्रट कारणाने किंवा गैरसमजामुळे तुटली जावीत इतकी नाती तकलादू नसावीत.
माझ्या बघण्यात दोन मित्र होते. अगदी जिवाभावाचे. एकमेकांसाठी अक्षरशः जीव काढून ठेवतील इतपत. त्यांची मैत्री, त्यांचं प्रेम बघून अनेकांना हेवा वाटायचा. त्यांच्या घराच्या नाजूक आर्थिक परिस्थितीत दोघे एकमेकांना सांभाळून घ्यायचा. त्यातील एक कमालीचा तापट, पण तितकाच भावनिक व प्रेमळ. मित्रासाठी वाटेल ते करायला तयार. अगदी त्याच्या मैत्रिणीच्या आईला भेटून जुगाड करण्याइतपत, तर दुसरा तितकाच शांत, संयमी, सांभाळून घेणारा.
काहींनी तर त्यांच्या मैत्रीमध्ये विष कालवण्याचादेखील प्रकार केला. पण त्यांची मैत्री तशीच घट्ट राहिली. साधारण एक तप त्यांनी ही निखळ जिवाभावाची मैत्री जपली. पण अचानक असं काहीसं झालं, की त्यानंतरची अनेक वर्षे ते दोघेही आज एकमेकाचे तोंड बघत नाहीत.
इतकी घट्ट मैत्री असतानाही असं नेमकं काय झालं, की ते एकेमकांचे शत्रू जरी झाले नसले तरी त्यांच्यात कायमचंच शत्रुत्वच निर्माण झालं. एकेमकांशी बोलल्याशिवाय चैन न पडणारे ते दोघे आज एक चकारशब्द बोलत नाहीत. इतका अबोला त्या दोघांना तरी कसा काय सहन होत असेल देव जाणे. अचानक त्यातील एकाचा मृत्यू झाला आणि मग दुसरा धाय मोकलून रडायला लागला. पण उपयोग शून्य.
वरकरणी पाहता ही एक साधारण घटना असली तरी अनेकांच्याबाबतीत हे घडतं. जिवाभावाचे मित्र, सख्खे भाऊ-बहीण कायमचे एकमेकांशी बोलायचे बंद होतात. अगदी स्वतः जन्म दिलेली मुलेदेखील कधी कधी आयुष्यभर आई-वडिलांशी अबोला धरतात. कोणताही मनस्वी किंवा भावनाशील माणूस खरंच असं वागू शकतो का, हा यक्षप्रश्न आहे. इतका टोकाचा तिरस्कार कसा, काय असू शकतो आणि तोही तुम्हीच कधी काळी जपलेल्या नात्यांमध्ये?
खरंतर माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला समाज लागतो. या समाजात नातेवाईक, मित्रमंडळी, शेजार-पाजारचे लोक असे अनेकविध लोक असतात. प्रत्येकाशी तुमचे पटतेच असे नाही. न पटणाऱ्या लोकांशी आपण कायम अंतर राखून राहतो. त्यांना जेवढ्यास तेवढे ठेवतोदेखील. पण जिथे आयुष्याचा फार मोठा काळ एकत्र घालवूनदेखील एखाद्या किरकोळ कारणामुळे नाती तोडण्यात कसला असुरी आनंद मिळत असेल लोकांना. नाती जपण्यात, सांभाळण्यात खरी मजा असते. कुठल्या तरी थुक्रट कारणाने किंवा गैरसमजामुळे तुटली जावीत इतकी नाती तकलादू नसावीत.
या सगळ्यामध्ये कहर म्हणजे दुर्दैवाने अशा संबंधातील एखादी व्यक्ती मरण पावली, की मात्र मागे राहिलेल्या दुसऱ्याला आठवणींचे उमाळे येतात. मग मेलेल्याचा सगळा चांगुलपणा आठवायला लागतो. मग हेच सगळं ती व्यक्ती जिवंत असताना का नाही केलं, हा प्रश्न पडतो. का तुमचा अहंकार तुमच्या निखळ नात्यात मोठा ठरला. तो इतका मोठा ठरला, की तुम्ही कायमचे बोलायचे बंद झालात. नाती महत्त्वाची असली, की वादाची कारणं महत्त्वाची ठरत नाहीत. त्यामुळे नाती जपायची असतील तर वादाचा एखादा मुद्दा बाजूला ठेवला तरी चालू शकतोच. कारण ते नातं, ती व्यक्ती, तो भावबंध त्या कारणापेक्षा नक्कीच महत्त्वाचा असतो.
त्यामुळे ज्याच्यासोबत आयुष्यातील अनेक सुख-दुःखे वाटून घेतली, त्याच्याशी आयुष्यभर न बोलण्याचा करंटेपणा करण्याआधी नात्यातील तो ओलावा पुन्हा सापडतो का ते शोधा. तेही ती व्यक्ती मरण्याआधी. ती व्यक्ती एकदा गेली की गेली. मग आठवणींचे उमाळे येऊन उपयोग नाही…