शहरात गणेशोत्सवाची चाहूल; यंदा अधिक उत्साह

पारंपरिक ढोल-ताशा पथकांची परंपरा कायम
पुणे : दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा मुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये कामाची लगबग वाढली आहे. गेली दोन वर्षे कोरोना साथीमुळे उत्सवावर अनेक निर्बंध होते. मिरवणुका काढता आल्या नाहीत, सजावट करता आली नाही. अशी अनेक बंधने होती. पुणेकरांनी सर्व बंधने पाळून उत्सव साजरा केला. यंदा मात्र उत्सवाची अधीरता कार्यकर्त्यांना अधिक आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पंच केदार मंदिराची प्रतिकृती सादर करणार आहे. सजावटीच्या कामास प्रारंभ झाला असून मंडप उभारणीसाठी वासापूजन करण्यात आले आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यंदा दिल्ली येथील श्री स्वामीनारायण मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे.
गणेशोत्सवातील परंपरेचा ताल
गणपतीच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरले असून गणेश मंडळांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे. आता ढोल-ताशा पथकांच्या गगनभेदी आवाजात मिरवणूक काढण्याची पद्धत पुण्यात रुढ होत आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी पुन्हा ढोल-ताशांच्या ढणढणाटाचा स्वर टीपेला पोहोचणार आहे.
अखिल मंडई मंडळाच्या सजावटीच्या कामास प्रारंभ झाला आहे. शहरात गणेशमूर्ती विक्रीची दुकाने सजू लागली आहेत. विविध प्रकारच्या मूर्ती आकर्षक पद्धतीने दुकानात मांडल्या आहेत. यंदा उलाढाल मोठी होण्याची शक्यता असल्याने बाजारपेठेत व्यापारीवर्ग खूश आहे. त्यांचीही धान्य, खाद्यतेले, साखर, डाळी असा माल भरण्याची तयारी चालू आहे. महापालिका, पोलिस प्रशासन उत्सवाच्या तयारीत गुंतले आहे. मुठा नदीकाठी वाद्य पथके ढोल ताशा वाजविण्याचा सराव करीत आहेत. मंडप मोठ्या आकाराचे उभे केले जातील. दोन वर्षे या व्यवसायाचे नुकसान झाले. यंदा ते काही प्रमाणात भरून निघण्याची आशा आहे.
राखीपौर्णिमा झाल्यानंतर गणपतीमूर्ती विक्रीचे स्टॉल वाढतील, तसेच सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीचे स्टॉल दिसू लागतील. महापालिका निवडणुका याचदरम्यान होणार असल्याने राजकारणी उत्सवात अधिक रस घेऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक उपक्रम येत्या महिनाभरात होतील. आरोग्य शिबिर भरविण्यावर अधिक भर दिलेला आढळतो.