माय जर्नी

अविस्मरणीय क्षण टिपणारा अवलिया

अनेक लोकांना आपल्या आनंदाचे क्षण फोटोमध्ये कैद करून ठेवायची इच्छा असते. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांना, या निसर्गातील बदलाला फोटो एकरूप करून घेत असतो. कुठल्याही फोटोपेक्षा अधिक आवडीने बघितले आणि जपले जातात ते विवाहप्रसंगाचे फोटो. तसे पाहायला गेले तर गेल्या काही वर्षांत वेडिंग फोटोग्राफीमध्ये अनेक बदल झाले आहेत. मात्र आठवणींना उजाळा देण्यासाठी ते वेडिंग फोटोअल्बम जतन करून ठेवण्याची भावना आजही तशीच आहे, हे प्रत्येक फोटोग्राफरला माहीत असते. असेच मूळ नाशिकचे छायाचित्रकार सौरभ अमृतकर हे एक आहेत. त्यांचे लहानपण हे नाशिकमध्ये व्यावसायिक कुटुंबात गेले. सौरभ यांच्या दृष्टीतून निवडलेल्या सृष्टीवरील सर्जनशील प्रवास लहानपणापासूनच सुरू झाला आहे. त्यांना त्यांच्या आत्याने खेळण्यातला कॅमेरा ते ३ वर्षांचे असतानाच गिफ्ट केला होता. डोळ्यासमोर हाताच्या बोटांचा गोल करून त्यातून बघण्याची दृष्टी जणू त्यांच्या आत्याने हेरली होती. त्यावेळी त्यांनी खेळण्यातल्या कॅमेऱ्याचं बटण आयुष्यात पहिल्यांदा प्रेस केलं होतं.

त्यानंतर त्यांच्या आईचं बोट धरून शाळेत जाताना वाटेवरील वैविध्यपूर्ण निसर्गसौंदर्य, पक्षी-प्राणी फुलपाखरांचं निरीक्षण या सर्व नैसर्गिक गोष्टी आवडीचा विषय ठरू लागले. त्यांच्या या कलेला वाव मिळाला तो ते सात-आठ वर्षांचे असताना. त्यांच्या घरात पहिला कॅमेरा आला तो रोलचा. मग ते घरातील छोटे-मोठे प्रत्येक समारंभ घरच्यांसोबत केवळ फोटोग्राफर म्हणूनच साजरा करू लागले. समाधान म्हणून त्यांच्या “रेडी पोझ” “स्माईल प्लीज” या शब्दांवर वडीलधारी मंडळी कौतुकाने त्यांच्या पुढ्यात उभी राहायची. तब्बल १२-१३ वर्षे पोझ पोझ या शब्दाचा उच्चार “पोझिशन प्लीज” होईपर्यंत या कॅमेऱ्याशी त्यांची निखळ आणि घट्ट मैत्री झाली होती. त्यानंतर ही मैत्री गेल्या पाच ते सहा वर्षांपासून डिजिटल कॅमेऱ्याशी झाली आहे.

सौरभ सांगतात की, लहानपणापासूनच्या कॅमेरारुपी मित्राने दिलेली ही दृष्टीच त्यांना नवनव्याने काम मिळवून देण्यात अत्यंत महत्त्वाचा वाटा उचलणारी ठरली. त्यांच्या डोक्यातल्या कलांना मूर्त स्वरूप देणारे मार्गदर्शक म्हणजे त्यांचे आई-वडील व नंतर नाशिकमधल्या अनेक ज्येष्ठ छायाचित्रकारांनी या विषयातील बारकावे जाणून घेण्यासाठी अभ्यासासाठीदेखील त्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे अनेक वैविध्यपूर्ण फोटोज कॅमेऱ्यात कैद केले गेले आहेत. विविध स्पर्धांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला असून आज सौरभ नाशिकच्या नामवंत फोटोग्राफरांपैकी एक म्हणून ओळखले जातात. तसेच नुकताच त्यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र “युवा कलागौरव” हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे सौरभ अमृतकर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या पुरस्काराबद्दल नाशिक छायाचित्रकार संघटनेतर्फे त्यांचा सत्कार व सन्मानही करण्यात आला. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश नक्की मिळते असं ते सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये