न्युट्रीशियनफिचरराष्ट्रसंचार कनेक्ट

उदरभरण नव्हे – फक्त खाणेच नाही; तर पोषक खाणे

श्वेता विनायक

आपल्या भारतीय संस्कृतीला प्राचीन अशी खाद्य परंपरा लाभली आहे आणि आजही बऱ्याच अंशी ही परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातो. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या भागवण्यासाठीच त्यांचे अविरत प्रयत्न सुरू असतात.

अन्न ही त्यातील प्रमुख गरज. प्राचीनकाळातील मानव फळे, कंदमुळे खाऊन आपला उदरनिर्वाह करीत असत. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा होऊन अन्न पिकवून, शिजवून त्याचे विविध पदार्थ बनवून चवीने ग्रहण केले जाऊ लागले, कारण त्यावेळीच ही गोष्ट मानवाला कुठेतरी जाणवत असावी, की आपण जे खातो ते फक्त उदरभरणासाठीच नाही तर ते खाणे पोषक असावे.
आपल्या आरोग्यासाठी हितावह असावे आणि त्या विचारानुसारच पुरातन काळापासून मानवाने प्रगती करण्यास सुरुवात केली.
खाद्यसंस्कृतीबाबत आपल्या पूर्वजांनी अभ्यासपूर्वक अशा काही प्रथा सुरू केल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे आहाराचा आणि शरीराचा, आपल्या मनाचा खूप जवळचा संबंध त्यांनी जाणला.

आपण जे पदार्थ ग्रहण करतो त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आपल्या मनावर जेव्हा परिणाम होतो त्यावेळी आपले वर्तन बदलते.
आपल्या उत्तम स्वास्थ्यासाठी पोषक आहार आपल्याला मिळणे गरजेचे आहे, त्याचा उपयोग फक्त एका व्यक्तीपुरता किंवा एका समूहापुरता मर्यादित नाही, तर तो समाजासाठी उपयुक्त आहे. अन्न आणि आहार तसे जुनेच पण अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. सुदृढ निरोगी राहण्यासाठी काय खावे, किती खावे, केव्हा खावे… असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. अन्न हे अत्यंत प्रभावशाली असे अस्त्र निसर्गाने आपल्याला दिले आहे. ज्याचा उपयोग आपल्या शरीराचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी होतो. अन्नामुळे जीवन घडते तर पोषक अन्न खाल्ल्यामुळे उत्तम आणि सर्व अर्थाने स्वस्थ असे मानवी जीवन घडते. अन्न आपण ऊर्जा मिळवण्यासाठी सेवन करतो. आजच्या स्पर्धेच्या युगात ताण-तणावाच्या आणि प्रदूषणाच्या जगात स्वतःला सिद्ध करायचे असेल तर सर्वप्रथम आपले शरीर निरोगी हवे आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपला आहार संतुलित हवा. देशातील व्यक्ती जेवढ्या अधिक निरोगी तेवढा देश अधिक प्रगतिशील, सुसंपन्न आणि बलशाली बनतो, हे शतशः सत्य आहे. तरीसुद्धा मागील काही वर्षांपासून आपल्या देशावर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढतोय आणि त्यानुसार बऱ्याच घरांमधून खानपानाच्या पद्धती बदलल्या आहेत. आधुनिकतेच्या नावाखाली पोषक पदार्थ पोटात जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळेच आज या विषयावर मंथन होणे गरजेचे आहे, की आज आपण जे अन्न खातो ते फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर शरीराच्या योग्य वाढीसाठी गरजेचे आहे आणि त्याचा समाजावर परिणाम होत आहे. हा बदल फारसा अनुकूल नाही. त्यामुळे आपल्या सवयी खानपानाच्या पद्धती बदलणे आज गरजेचे झाले आहे.

मानवी समूहाला एकत्र बांधून ठेवण्यात समाजाचा खूप मोठा वाटा आहे, कारण मानव हा समाजशील प्राणी आहे आणि आपल्या खाद्यसंस्कृतीबाबत पूर्वजांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन समाज सुदृढ बनवणे ही आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये