संपादकीय

ज्ञानदीप लावू जगी

दिवाळीमध्ये प्रकाशाच्या वाटेवरचे वारकरी आपण होणे आवश्यक आहे. संवेदनशीलता आणि मानवता यांचे दीप उजळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्ञानदीप लावू जगी म्हणत असताना रचनात्मक कार्यांवर आपण भर दिला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित होईल नव्हे शतगुणित होईल.

दोन वर्षांच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची दिवाळी अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी होत आहे. आमच्या असंख्य वाचकांना, विक्रेत्यांना, जाहिरातदारांना आणि हितचिंतकांना आजपासून सुरू झालेल्या दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! वातावरणाचा परिणाम समाजमनावर होत असतो. हे वातावरण नैसर्गिक किंवा कोरोना काळात अनुभवलेले कृत्रिमही असू शकते. मात्र या सर्व अंधकारातून प्रकाशाकडे जाणारी वाट आणि त्या वाटेपासून उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यापर्यंत घेतलेले प्रामाणिक कष्ट यामुळे आपण दिवाळीचा आनंद आज उपभोगत आहोत. या काळात वैद्यकीय क्षेत्र स्थानिक स्वराज्य संस्थांतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी त्याचबरोबर अनेक स्वयंसेवी संस्था त्यांचे स्वयंसेवक, शासकीय यंत्रणा, अत्यावश्यक सेवा क्षेत्रातील कर्मचारी यांनी जिवाची बाजी लावून एका अर्थी मानव जातीवर उपकार केले. आजच्या दिवाळीत या सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करणे उचित ठरेल. मात्र कोरोना संपताच त्यातून सकारात्मक, विधायक काही शिकण्याऐवजी स्वार्थ आणि आपल्या विचारांचा परिघ आपण ज्या पद्धतीने अरुंद करत चाललेलो आहोत ती बाब धोकादायक आहे.

ज्ञान आणि आलेले अनुभव यांची सांगड घालून वाटचाल करणे आवश्यक असते. मात्र तसे न होता आलेल्या अनुभवातून आपण अत्यंत आत्मकेंद्री होत जात असू, तर ते धोकादायक आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, एकमेकांमध्ये असणारे तणावपूर्ण संबंध, सामाजिकदृष्ट्या असणारी स्थिरता, आर्थिकदृष्ट्या वाढत चाललेली दरी, विषमता, जाती-पातीचे राजकारण, संवेदनशील मुद्द्यांवर अत्यंत उथळपणे होणारी टीकाटिप्पणी आणि त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया या सगळ्यांना आता आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात किंवा जीवन समृद्ध करण्यामध्ये स्थान देता कामा नये. प्रकाशाची बीजे आपण या दिवाळीनिमित्त हृदयामध्ये रुजवली पाहिजेत. याच्या उजेडात सत्य, शिव, सुंदर याचा बोध व्हायला पाहिजे. आपल्या विचारांची क्षितिजे अधिक विस्तारली पाहिजेत आणि त्यावर मनमोहक इंद्रधनुष्यही दिसले पाहिजे. दिवाळी म्हणजे विवेकाचे भान असणे होय. दिवाळी म्हणजे जागृततेची वाटचाल. दिवाळी म्हणजे जागृतीची पहाट होय. दिवाळी केवळ दिव्यांचा उत्सव नाही, तर अंतरंगातही दिव्याची ज्योत प्रकाशित करण्याचा उत्सव आहे.

संत सोयरा अत्यंत अार्तपणाने ‘अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे’ असे जेव्हा सांगते तेव्हा तो दिवा केवळ बाह्य जगताला उजेड देणारा नसतो, तर अंतरात्म्यातील अंधकार संपवणारा असतो हे लक्षात घेतले पाहिजे. दिवाळीमध्ये प्रकाशाच्या वाटेवरचे वारकरी आपण होणे आवश्यक आहे. संवेदनशीलता आणि मानवता यांचे दीप उजळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्ञानदीप लावू जगी म्हणत असताना रचनात्मक कार्यांवर आपण भर दिला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित होईल नव्हे, शतगुणित होईल. एक आहे दिवाळीत आनंद द्यावा, आनंद घ्यावा. आनंदाचा उन्माद दोन वर्षांनंतर निर्माण होऊन आपण त्यात वाहवत जाऊ नये हे पाहावे. दिवाळीत फटाके उडवताना, काही वेळा निष्काळजीपणामुळे, तर काही वेळा बेफिकीरीत अपघात होतात. याला केवळ आपण आणि आपणच जबाबदार असतो. हे टाळणे आवश्यक आहे. आपल्या कृत्याने आनंदावर विरजण पडू नये आणि आपल्याबरोबर दुसऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली, तर नक्कीच दोन वर्षांनंतर साजरी होणारी ही दिवाळी आनंदाचा ठेवा घेऊन येईल आणि सुखद स्मृती ठेवून जाईल, हे मात्र खरे!
मी अविवेकाची काजळी। फेडोनी विवेक दीप उजळी॥
ते योगिया पाहे दिवाळी॥ निरंतर॥
पुनश्च सगळ्यांना शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये