IND Vs NZ : आज होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, ‘या’ खेळाडूंवर सर्वांच्या नजरा
रायपूर : (IND vs NZ, 2nd ODI) भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळवला जाणार आहे. पाहुण्या संघााला दुसऱ्या सामन्यात चितपट करुन, मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा इरादा असणार आहे. न्यूझीलंडचा संघ आजपर्यंत भारतात एकही एकदिवसीय मालिका जिंकू शकलेला नाही. त्यामुळेच आजचा हा सामन्यात पहिल्या सामन्याप्रमाणे रोमांचक लढत पाहायला मिळू शकते. एकीकडे भारताला मालिकेत निर्णायक आघाडी मिळवायची आहे, तर न्यूझीलंड मालिका बरोबरीत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, या महत्त्वूर्ण सामन्यात कोणते खेळाडू महत्त्वाची भूमिका बजवणार हे पाहाणं महत्त्वाचे ठरणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सध्या तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या एका महिन्यात त्याने वनडेत तीन शतकं झळकावली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात लवकर बाद झालेल्या कोहलीकडून दुसऱ्या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात द्विशतक झळकावणारा शुभमन गिल चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून त्याची वनडेतील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करणारा तो भारताचा पहिला फलंदाज आहे. शुभमनने सलग दोन सामन्यात दोन शतकं झळकावली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा एकदा संस्मरणीय कामगिरी करायची आहे.