पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

कॉलेज विद्यार्थ्यांसाठी अनलिमिटेड दारूविक्री

लोणी काळभोर येथील हॉटेलचालकाचा अजब प्रकार

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात एक संतापजनक प्रकार नुकताच समोर आला आहे. लोणी काळभोर हद्दीतील एका नामांकित खासगी विद्यापीठाच्या दारातच “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ७९९ रुपयांत दोन तास अनलिमिटेड दारू” अशी जाहिरात करून खुली दारूविक्री सुरू केल्याचे उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आता पोलिस प्रशासनासह विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

सध्या संपूर्ण राज्यात दारूबंदी आहे. दारूबंदीचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. खासकरून शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयाच्या किमान पाचशे मीटर परिसरात दारूबंदी आहे. असे असतानाही अशा चुकीच्या जाहिराती करून कायदा तुडवू नये. विद्यार्थ्यांनी अशा व्यसनांपासून दूरच राहावे.

-वैभव मोरे, पोलीस उपनिरीक्षक, लोणी काळभोर

पुण्यातील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी या घटनेबाबतची पोस्ट फेसबुकच्या माध्यमातून प्रसारित केल्यानंतर, लोणी काळभोर हद्दीतील एका नामांकित खासगी विद्यापीठाच्या दारातच वरील संतापजनक प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्याच दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनीही तत्काळ हालचाली करून कदमवाकवस्ती हद्दीतील द टीप्सी टेल्स हॉटेल” या हॉटेलच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. देवीप्रसाद सुभाष शेट्टी (वय ३३, रा. बी-१००१, जयमाला बिजनेस कोर्ट, शेवाळवाडी, ता. हवेली) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या हॉटेलचालकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक प्रदीप भीमराव क्षीरसागर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी स्टेशन परिसरात द टीप्सी टेल्स नावाचे हॉटेल असून, हे हॉटेल देवीप्रसाद सुभाष शेट्टी याने चालवण्यास घेतलेले आहे.

दारूबंदी कायद्याचे पालन करणे गरजेचे…

शाळा, महाविद्यालय अथवा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून किमान शंभर मीटर अंतरावर दारूविक्री करण्यास कायद्याने बंदी असतानाही शेट्टी मात्र राजरोसपणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दारूची विक्री करीत होता. स्थानिकांनी याबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शेट्टी याने स्थानिक गुंडांना हाताशी धरून वरील घटनेबाबत आवाज उठवणाऱ्या नागरिकांचा आवाज बंद केला होता. दरम्यान, पुण्यातील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी गुरुवारी सायंकाळी वरील घटनेबाबतची पोस्ट फेसबुकच्या माध्यमातून प्रसारित केल्यानंतर पुण्यासह लोणी काळभोर परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. दारूबंदीचा कायदा अस्तित्वात आहे. त्यामुळे कायद्याचे पालन केल्यास गैरप्रकाराला आळा बसण्यास मदत होईल.

मागील काही दिवसांपासून शेट्टी याने आपल्या हॉटेलचा दारूचा व्यवसाय वाढावा यासाठी लोणी काळभोर येथील एका बड्या खासगी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरच “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ७९९ रुपयांत दोन तास अनलिमिटेड दारू” अशी जाहिरात करून खुली दारूविक्री सुरू केली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये