ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच मी आज मुख्यमंत्री होऊ शकलो”

मुंबई | Eknath Shinde – आज (6 डिसेंबर) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईतील चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल, असं अश्वासन दिलं. तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच माझ्यासारखी सामान्य कुटुंबातील व्यक्ती आज मुख्यमंत्री होऊ शकली, अशी भावनाही शिंदेंनी व्यक्त केली.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “आज महापरिनिर्वाण दिनामित्त मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज आपण केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळेच जगामध्ये ताठ मानेनं उभे आहोत. सर्वसामान्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे अधिकार प्राप्त झाले. त्यांना जगण्याचा हक्कही मिळाला. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच सर्वसामान्य माणूस आज सर्वोच्च पदावर जाऊ शकला. राज्यातही माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकला. मला राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य झालं. बाबासाहेबांचा मी शतश: ऋणी आहे. आंबेडकरांनी देशाला, समाजाला दिशा दिली आहे. त्यांनी दुर्बलांना सशक्त करण्याचं काम केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सामान्य माणूस हा केंद्रबिंदू होता. मानवमुक्ती हेच त्यांचं धेय्य होतं. त्यांनी भारतातीलच नव्हे तर जगभरातील वंचितांच्या हक्कांना, मानवी प्रतिष्ठेला वैचारिक आणि संघटनात्मक बळ दिलं आहे. दलित समाजात रुजलेली न्यूनगंडाची भावान काढून टाकली. त्यांनी संघटित होण्यास बळ दिलं. शिका संघटित व्हा, असा मूलमंत्र त्यांनी दिला आहे.”

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिल येथील भव्यदिव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. आम्ही या स्मारकाला भेट दिली असून तेथील कामाचा आढावा घेतला. मी मुख्यमंत्री झालो आणि सरकार स्थापन केलं. त्यानंतर मी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. आमचं सरकार बाबासाहेबांनी जो विचार दिला, जो मार्ग दाखवला त्यावरच चालेल असा मी निर्धार केला आहे. डॉ. बाबासाहेब यांचं वास्तव्य असेलेल्या राजगृह या वास्तुलाही मी भेट दिली. ती वास्तू ऐतिहासिक ठेवा आहे. बाबासाहेबांच्या वापरातील अनेक वस्तू, छायाचित्र, त्यांच्या अभ्यासाची खोली या सर्व ऐतिहासिक ठेव्याला जोपासले जाईल. लोअर परेल येथील स्मारकाच्या कामाचीही पाहणी केली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी जपण्याचं काम केलं जाईल. आर्थिक, सामाजिक लोकशाही नसेल तर राजकीय लोकशाही यशस्वी होणार नाही, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये