‘हे’ प्रसिद्ध गीत असणार महाराष्ट्राचे राज्यगीत; शिवजयंतीपासून होणार अंमलबजावणी

Jai Jai Maharashtra Maza will be state song : ज्या गाण्याने मराठी माणसाची छाती स्वाभिमानाने फुलते असे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल 62 वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं आहे. महाराष्ट्राची महती सांगणारे हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असेल.
राजा बडे यांनी हे गीत लिहिलं आहे. इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन घडवून देणाऱ्या या गाण्याला शाहिर साबळे यांचा भारदस्त आवाज लाभला. आज कित्येक वर्षांनी देखील जय जय महाराष्ट्र माझा हे शाहिर साबळेंच्या आवाजातील गीत अंगावर शहारे आणतात.
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयापैकी हा महत्वाचा एक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील घेतलेल्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 ला या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.