मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मार्गिकेवर नॉइज ब्लॉक्स

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा देशातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असताना बांधकामासंबंधित नवीन माहिती समोर आली आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ही कंपनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पाहत आहे. बुलेट ट्रेन (Bullet Train) च्या १०० किमीपेक्षा जास्त लांब मार्गिकेवर २०,००० पेक्षा अधिक नॉइज ब्लॉक्स बसवण्यात आले आहेत, अशी माहिती एनएचएसआरसीएल कंपनीने दिली आहे. बुलेट ट्रेन आपल्या वायुवेगासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा ट्रेनचा वेग आणि वातावरणातील हवा यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता असते. तेव्हा वाढत्या वेगामुळे प्रचंड आवाज होतो. या आवाजामुळे प्रवाशांना त्रास होऊ शकतो. बुलेट ट्रेन चालताना प्रवाशांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी ट्रेनच्या मार्गिकेवर नॉइज ब्लॉक्स बसवले जातात. बुलेट ट्रेनच्या मार्गिकेवरही असेच नॉइज ब्लॉक्स (Noise Box) बसवण्यात आले आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Ahmedabad Bullet Train ) मार्गिकेवर बसवण्यात आल्याची माहिती एनएचएसआरसीएल कंपनीने सोशल मीडियाद्वारे दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलेटच्या मार्गिकेवर तब्बल २०,००० पेक्षा जास्त नॉइज ब्लॉक्स उभारण्यात आले आहेत. यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना आवाजामुळे त्रास होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.