
मुंबई : विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी गोळा केलेला निधी राजभवनाचे खाते नसल्याने सोमय्यांनी पक्षाला दिला, असा धक्कादायक युक्तीवाद सोमय्यांच्या वकिलांनी आता न्यायालयात दिला आहे. किरीट सोमय्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सरकारी वकिलांकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
Save Vikrant मोहिम राबवून सोमय्यांनी ५८ कोटी रुपये गायब केल्याचा आरोप राऊतांनी नुकताच केला होता. त्याप्रकरणी बबन भोसले नामक एका व्यक्तीनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोमय्या यांच्या वकीलाने युक्तीवाद करताना मोहिमेतून उभा राहिलेला पैसा हा सेव्ह विक्रांतलाच दिल्याचं म्हणत त्यांच्या जामिनाची मागणी केली होती. मात्र सरकारी वकिल प्रदीप घरत यांच्याकडून सोमय्यांची मागणी फेटाळून लावत जोरदार युक्तीवाद करण्यात आला. सोमय्यांकडून राजभवनाला कोणताही निधी गेलेला नाही. त्यामुळे हा पैसा नक्की गेला तर गेला कुठे हा फार मोठा प्रश्न आहे, असं घरत यांच म्हणणं आहे.
दरम्यान राऊत म्हणालेत की, सोमय्या महाराष्ट्रदोही होतेच पण ते देशद्रोही देखील आहेत. मात्र सोमय्यांनी त्यांच्यावर होत असलेले हे आरोप फेटाळून लावले आहेत. राऊत आरोप करत असलेला ५८ कोटींचा हा आकडा नक्की आला कुठून? असा प्रतिसवालच सोमय्यांनी शनिवारी उपस्थित केला होता.