मणिपूर अत्याचार: सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; केंद्राने तपास सोपवला CBIकडे
नवी दिल्ली : (Manipur Atrocities Case) मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करुन या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे सांगितलं.
स्थानिक सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्यातील हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. १८ जुलैपासून राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गृह मंत्रालय मैतई आणि कुकी संघटनांच्या संपर्कात आहे. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सातत्याने चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही सर्व माहिती दिली आहे.
मणिपूर महिला अत्याचाराची सुनावणी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या गुरुवारी मणिपूरमध्ये महिलांच्या छेडछेडीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वतःहून दखल घेतली होती. केंद्र आणि मणिपूर सरकारने दोषींवर कडक कारवाई करावी, अन्याथा आम्ही करू, अशी महत्त्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने बजावले होते.