ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘मराठी राजभाषा दिन’ यातील फरक समजून घ्या!

Marathi Bhasha Gaurav Din 2023 : कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलं. मराठी कवितेला कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. शिवाय महाराष्ट्राच्या मायबोलीला साहित्यात विशेष स्थान निर्माण करुन देण्यात कुसुमाग्रजांचं मोलाचं योगदान आहे. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन करत जगभरात 27 फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मराठी भाषिक आहेत, तिथे हा दिन साजरा करतात. या दिवशी मराठी भाषिक एकमेकांना शुभेच्छा देतात. मात्र, शुभेच्छा देताना अनेकदा मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यात गल्लत केली जाते. जाणून घेऊया दोन्हीमधील नेमका फरक काय आहे?

‘मराठी भाषा गौरव दिन’

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून नमूद करण्यात आला आहे. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी कवितेला कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शिवाय महाराष्ट्राच्या बोलीला साहित्यात विशेष असे स्थान निर्माण करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्याची दखल घेऊन त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात.

‘मराठी राजभाषा दिन’

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार राष्ट्रपतींना आहेत. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून 1 मे हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ किंवा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं 10 एप्रिल 1997 रोजी काढलेल्या परिपत्रकात 1 मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये