राज ठाकरेंना नडणाऱ्या बृजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया
औरंगाबाद | भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्यावर महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेची (MNS) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गुंड प्रवृत्तीच्या बृजभूषण सिंहांची हकालपट्टी करा, अशी पहिली मागणी मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केली. तसंच भाजपच्या महिला आघाडीने यावर आपलं मत मांडलं पाहिजे, अशी मागणीही मनसेने (MNS) केली.
मनसेकडून बृजभूषण सिंहांची हकालपट्टी करण्याची मागणी
यावेळी प्रकाश महाजन म्हणाले, “बृजभूषण यांची कुस्तीगीर परिषदेवरून हकालपट्टी करा. हा माणूस गुंड प्रवृत्तीचा. तो स्त्रियांच्या बाबतीत कसा आहे समोर आलं आहे. त्याने कुस्तीगीरसंघाचा राजीनामा दिला पाहिजे” असे ते म्हणाले. यासंदर्भात महाराष्ट्रातील इतर नेते काय भूमिका घेणार असा सवाल देखील प्रकाश महाजन यांनी केला आहे.
गुंड प्रवृत्तीच्या बृजभूषण सिंहांबाबत (Brij Bhushan Singh) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका मांडावी, असंही प्रकाश महाजन म्हणाले. “बृजभूषणबाबत पवार यांचं काय म्हणणं आहे ? सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं काय म्हणणं आहे. संजय राऊतांचं (Sanjay Raut) काय म्हणणं आहे ? असा सवालही प्रकाश महाजन यांनी केला.