राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

मुस्लिम बांधवांनो! पवित्र कुराणचा अर्थ समजून घ्या!

प्रा. डॉ. एस. एन. पठाण

ज्या विद्वान व ज्येष्ठ लोकांना प्रवचनकार म्हणून बोलावीत होतो ते आमचे निमंत्रण लगेच स्वीकारत होते हे विशेष. मौलाना इस्माईल कासमी, मौलाना जब्बार कासमी, (लातूर) इश्त्याक अहमद (अकोला), डॉ. रफीक सय्यद (अहमदनगर), मुफ्ती उवैस कासमी, इ. ज्या मौलानांना आम्ही पाचारण केले, त्या सर्वांनी निमंत्रण स्वीकारले व ‘दर्श-ए-कुरआन’चा कार्यक्रम दररोज उच्च प्रतीचा होत गेला.

विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणे, या बिगरमुस्लिम संस्थेने पवित्र कुराणचा अर्थ मुस्लिम बांधवांना समजावा, म्हणजेच पवित्र कुराणचे निरुपणाचा कार्यक्रम ‘दर्श-ए-कुरआन’चा सप्ताह आयोजित करणे कदाचित देशातील पहिलीच व ऐतिहासिक घटना असावी. सुदैवाने पवित्र रमजान महिना नुकताच सुरू झाला होता. विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सरांनी ‘दर्श-ए-कुरआन’ सप्ताहाचे आपल्या जन्मगावी रामेश्वर (रुई), ता. जि. लातूर येथे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आणि अर्थातच माझी जबाबदारी वाढली. रमजान महिन्यात मुस्लिमबांधव दिवसभर उपवास करतात. पाणीसुद्धा प्यायचे नसते. संध्याकाळची प्रार्थना झाली की, रात्रीची विशेष प्रार्थना (तराबी) असतेच. त्यामुळे ‘दर्श-ए-कुरआन’ कार्यक्रम आयोजित करणे हे माझ्यापुढे आव्हान होते.

‘दर्श-ए-कुरआन’ दररोज दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी ९.३० ते ११.३० व सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत घ्या, असा प्रा. डॉ. कराड सरांचा आग्रह होता. शिवाय रामेश्वर (रुई) आडवळणाचे गाव. येथे ६०-७० मुस्लिम समाज. कार्यक्रमाला श्रोते आले नाही तर? त्यावर कराड सर लगेच म्हणाले, अहो, कुणीही आले नाही तरी आपण दोघे हक्काचे आहोतच. आपण दोघे बसू. परंतु कार्यक्रम झाला पाहिजे. अडचणींचा कितीही पाढा कराड सरांच्यापुढे वाचला तरी ते ऐकत नाहीत व मग बरोबर वेळेवर त्यांना ईश्वराची हमखास मदत येते व कार्यक्रम अद्वितीय यशस्वी होतो, असा गेल्या अनेक वर्षांचा माझा अनुभव होता. त्यामुळे मी तयारीला लागलो. ‘दर्श-ए-कुरआन’चे उद्घाटन करण्यासाठी उत्तम प्रवचनकार मिळविणे याची जबाबदारी होतीच. रामेश्वर (रुई), ता. जि. लातूर येथे ह. जैन्नुद्दीन चिश्ती दर्ग्याशेजारील ‘इदगा’ मैदानावर अत्यंत सुंदर पांढर्‍या शुभ्र धवल रंगात बंद मंडप घालण्यात आला होता. एकच प्रवेशद्वार मंडपाला ठेवले होते. आत संपूर्ण गालिचा, अतिशय देखणे व्यासपीठ, बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. रविवारी (दि. ३ जून) मुंब्रा येथील ‘हादीस व शरियत’ शिकविणार्‍या एकमेव कॉलेजचे प्राचार्य डॉ. खालिद जमील मक्की (यांनी मक्केमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे.) यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित झाला. मक्कीसाहेब रामेश्वरला (रुई) ला पोहोचले हीदेखील ईश्वराची मदतच म्हणावी लागेल. हभप दंडवतेमहाराज, लातूरचे मौलाना मोहंमद इस्माईल कासमी, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, मुफ्ती मोहंमद कासमी, मौलाना अय्युब उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते. अत्यंत शांत व पवित्र वातावरणात हा देखणा उद्घाटन समारंभ पार पडला.

जोपर्यंत लोकांना धर्म काय आहे हे कळणार नाही तोपर्यंत ते अज्ञानापोटी सतत अनिष्ट गोष्टी करणार व त्यामुळे धर्म संकल्पना बदनाम होते, हा मा. कराड सरांचा विचार व त्यामुळे अजान (बांग) व नमाज (प्रार्थना) नेमकी काय असते, त्या मंत्राचा अर्थ काय आहे? हे लोकांना कळले पाहिजे, अशी मा. कराड सरांची फार इच्छा होती. त्यामुळे समझिये अजान और नमाज क्या है? या प्रस्तुत लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला व उपस्थित श्रोतृवर्गाला या पुस्तकाच्या प्रती वाटण्यात आल्या. मुस्लिम बांधवांनो, पवित्र कुराणचा अर्थ समजून घ्या! असे महत्त्वपूर्ण उद्गार उद्घाटन समारंभात प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सरांनी काढले. त्यावेळी ते म्हणाले, धर्म म्हणजे आपले कर्तव्य. मग ते आई-वडिलांसाठी, समाजासाठी किंवा राष्ट्रासाठी असेल. डॉ. पठाण यांच्या या पुस्तिकेमुळे सामान्य मुस्लिमांना नमाज व अजानचा खरा अर्थ कळेल व हिंदू बांधवसुद्धा ते वाचू शकतात, अशी पुस्ती प्रा. डॉ. कराड सरांनी जोडली.

एव्हाना विश्वशांती केंद्राच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या या ‘दर्श-ए-कुरआन’ची बातमी संपूर्ण मराठवाड्यात पोहोचली होती. आसपासच्या गावांतून व शहरांतूनदेखील हिंदू-मुस्लिम लोक ‘दर्श-ए-कुरआन’ ऐकण्यासाठी खासगी गाड्या भरभरून येत होत्या. या सर्व श्रोत्यांची आता मात्र आम्हाला मंडपात व्यवस्था करणे शक्य नव्हते. गर्दी दररोज वाढत होतीच. संध्याकाळी प्रवचनानंतर उपवास असणार्‍या मुस्लिम बांधवांसाठी उपवास सोडण्याची व्यवस्था मशिदीसमोर मंडप घालून विश्वशांती केंद्राने केली होती. त्या काळामधील ते इतके उत्साही, आनंददायी वातावरण पाहून प्रत्येक हिंदू-मुस्लिम मा. कराडसाहेबांच्या योजकतेला व त्यांच्या विश्वधर्मीपणाला व विश्वशांतीच्या कार्याला मनोमन प्रार्थना करून दुआ देत होते. प्रा. डॉ. कराड सर नुसते विश्वशांतीदूत नाहीत, तर ईश्वराने धर्माच्या समन्वयासाठी पाठविलेला फार मोठा फरिश्ता (संत, देवदूत) आहे, असेच सर्व जण बोलत होते.

या संपूर्ण ‘दर्श-ए-कुरआन’मधील मानवतेचा संदेश सामान्य श्रोत्यांना समजला. पवित्र कुराणमध्ये असे म्हटले आहे, ‘ज्याने एखाद्या माणसाची विनाकारण हत्या केली तर त्याने जणू काही सर्व मानवजातीची हत्या केली आणि ज्याने कोणाला जीवदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवदान प्रदान केले.’ – पवित्र कुराण (५:
आतंकवादी म्हणून स्वतःला घोषित करणार्‍या लोकांना पवित्र कुराणमधील हा संदेश समजत नाही काय? हे आतंकवादी तर पवित्र कुराणच्या विरुद्ध कार्य करून धर्माला बदनाम करीत आहेत, याची चर्चा मंडपात होत होती. अशा या आतंकवाद्यांवर कारवाई होणे किती जरूर आहे, असे म्हणून सर्व श्रोत्यांच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला. ‘परमेश्वर सत्कृत्य करणार्‍यावर प्रेम करतो’ – पवित्र कुराण (२: या संदेशावर प्रवचन करताना इस्लाम म्हणजे बंधुभाव, मानवता, सदाचार, मोठ्यांचा मान व लहानांवर प्रेम, सतत ज्ञान मिळविण्याची वृत्ती, महिलांशी सद्भाव व महिलांचा सन्मान, ईश्वरावर नितांत श्रद्धा जे काही तुम्हाला मिळाले ते ईश्वराच्या कृपेनेच, तेव्हा सत्पात्री दान, अन्नदान, जकात, खैरात यावर विशेष माहिती मिळाल्यामुळे श्रोतृवर्गामध्ये अत्यंत आनंदाचे
वातावरण होते.

(लेखक माजी कुलगुरू व आळंदी
येथील विश्वशांती केंद्राचे समन्वयक
आणि सल्लागार आहेत.)
संपर्क ः ९८२२३६२६०३

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये