“मला पुढे जाता यावं म्हणून माझ्या पत्नीने…”; निलेश साबळेने सांगितल्या ‘त्या’ खास गोष्टी

मुंबई | Nilesh Sabale Compliments His Wife – झी मराठी या वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या कार्यक्रमातील सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असतो. तसंच लवकरच झी मराठी वाहिनीवर’सत्यवान सावित्री’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत वेदांगी कुलकर्णी आणि आदित्य दुर्वे सत्यवान सावित्रीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. नुकतंच या मालिकेच्या निमित्ताने निलेश साबळेने त्याच्या पत्नीबद्दलच्या काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.
डॉ. निलेश साबळे याने पत्नी डॉ. गौरी साबळेबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. यावेळी तो म्हणाला, “खरं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सावित्री फार महत्वाची असते ती म्हणजे आपली अर्धांगिनी. प्रत्येकाच्या आयुष्यात पत्नी ही महत्त्वाची असते. तशीच माझ्याही आयुष्यात आहे आणि तिचं नाव डॉ. गौरी साबळे असं आहे. आज आमच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. या सगळ्या प्रवासात तिने मला उत्तम साथ दिली.”
“आमचा प्रेमविवाह झाला आहे. त्यावेळी मी काहीच कमवत नव्हतो. पण तिने मला होकार दिला. त्यावेळी तिने मला विचारलं होतं की तू प्रॅक्टिस करशील की आवडत्या क्षेत्रात करिअर करशील? तिच्या या प्रश्नावर उत्तर देताना मी म्हटलं होतं की, मी कदाचित प्रॅक्टिस करणार नाही. पण तिने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला. यानंतर ती मला म्हणाली होती जर तुला लवकर काम मिळालं नाही तर मी तुझ्याबरोबर आहे. मी प्रॅक्टिस करेन आणि घर चालवेन, पण तुला ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रात जा”, असं देखील निलेश साबळेनं सांगितलं आहे.
पुढे निलेशने सांगितलं, “ती उत्तम कलाकार आहे, ती छान गाते, तिला चित्रकलेची खूप आवड आहे. पण या सगळ्या कला तिच्याकडे असताना सुद्धा केवळ आणि केवळ मला पुढे जाता यावं म्हणून ती या कलांकडे आतापर्यंत दुर्लक्ष करत आली. मला वाटतं आता तिने त्या कलांकडे लक्ष दिलं पाहिजे. माझ्या प्रत्येक गोष्टीत ती माझी साथ देते. माझं जास्त जागरण होऊ नये म्हणून तिने लिखाण, एडिटींगसुद्धा शिकून घेतलं आहे. ती विनोद सुचवते, वेगवेगळ्या कल्पना मांडते या सगळ्या गोष्टीत ती फार चांगल्यारितीने सहभाग दर्शवते”.
“मला माझ्या कामात आनंद मिळावा, असं तिला सतत वाटत असतं. ती माझी सावित्री आहे. मला तिचा खूप अभिमान वाटतो”, असंही तो म्हणाला. दरम्यान २०१३ साली निलेश साबळे आणि गौरीचा विवाह संपन्न झाला होता. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना या दोघांची भेट झाली. तिथेच निलेशला गौरी आवडू लागली. लेखन, निवेदन, अभिनेता आणि दिग्दर्शन अशा विविध भूमिकेत दिसणारा निलेश साबळे आयुर्वेदिक डॉक्टर देखील आहे.