मराठी राज्याची पहिली राजधानी ‘राजगड’

पुणे : भारताच्या महाराष्ट्र राज्यातील राजगड हा किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ किमी अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर
उभा आहे.
मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे.
शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती, म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजीमहाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४
मीटर आहे.