“मोहम्मद जुबेर यांची कारागृहातून तात्काळ सुटका करा”; ‘या’ कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
!["मोहम्मद जुबेर यांची कारागृहातून तात्काळ सुटका करा"; 'या' कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश mohammad zubair 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/mohammad-zubair-1-780x470.jpg)
नवी दिल्ली – Mohammad Zubair : अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी (२० जुलै) न्यायालयाने त्यांना विरोधात सुरु असलेल्या सर्व प्रकरणांत जमीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर कारागृहातून जुबेर यांची तात्काळ सुटका करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ही सुनावणी केली आहे.
सर्व प्रकरणांत जमीन मंजूर करण्याबरोबरच त्यांच्या विरोधातील सर्व एफआयआर दिल्ली पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात यावेत त्याचबरोबर जुबेर यांची कारागृहातून तात्काळ सुटका करण्यात यावी असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे जुबेर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘मोहम्मद जुबेर यांना जामीन नाकारण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही. त्यामुळे कलम ३२ अंतर्गत त्यांना सर्व प्रकरणांमध्ये जामीन मंजूर करण्यात येत आहे.’ असं न्यायालयाकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे.
जुबेर यांनी २०१८ मध्ये केलेल्या कथित वादग्रस्त ट्वीट वरून दिल्ली मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय गाझियाबाद, मुझफ्फरनगर, चांदोली, लखीमपूर खेरी, सीतापूर आणि हातरस येथेही त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. जुबेर यांनी धार्मिक भावना भडकवणे, दुखावणे त्याचबरोबर द्वेषाला उत्तेजन देणे अशा आरोपांखाली त्यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ११ जुलै रोजी १४ दिवसांची कोठडी देखील सुनावली होती.
त्याचबरोबर, ‘जुबेर यांनी विदेशातून काही रक्कम स्वीकारलेली असून, त्याबद्दल त्यांनी अजून माहिती दिली नाही’ असे देखील त्यांच्यावर आरोप आहेत. पोलिसांनी त्याबाबतही न्यायालयात सांगितले होते. मात्र, जुबेर यांच्या वकिलांनी त्यासंदर्भात सर्व दावे फेटाळले आहेत.