
संतपंचमी व सरस्वतीपूजन दिन. मला सकाळीच वसंतपंचमी आहे हे आठवून देवी सरस्वती भक्तिगीते आठविली, विशेषत: कवी निराला (सूर्यकांत त्रिपाठी) यांचे “वरदे वीणावादनी वरदे वरदे ऽऽ” व “माता सरस्वती शारदे” हे लताताईने गायलेले मधुर गीत कानात घुमून गेले. मनाने महादेवी सरस्वतीचे नमन केले होते. रात्री बातम्यात ऐकले वसंतपंचमी, देवी सरस्वतीपूजन याचे समारंभ इत्यादी व लताजी आयसीयूमध्ये असून त्यांचे ठीक होण्यासाठी प्रार्थना व हवन करीत आहेत यासंबंधी. ६ फेब्रुवारी सकाळी प्रथम चहा घेताना टीव्ही लावला तर बातमी आली, भारतरत्न गानसम्राज्ञी लताताई परलोकवासी झाल्या ही माहिती. आमच्या घरी मंगेशकर कुटुंबाविषयी बोलणी होत. माझे वडील कै. ती. अण्णा यांचा कोल्हापूरमध्ये ट्रान्स्पोर्टचा मोठा उद्योग होता. नटश्रेष्ठ बालगंधर्व व मास्टर दीनानाथ मंगेशकर आपल्या कामासाठी भेटत असत.
आमचे बालपणी २ गल्ली शाहूपुरीत बाबा देशपांडे यांच्या घरी राहत होतो. कै. ती. आईबरोबर शाहूपुरीत देवी तुळजाभवानी मंदिर व राधाकृष्ण मंदिर, काही वेळी महालक्ष्भी मंदिर जात असू, लताजींची मधुर मराठी गीते व सिनेसंगीत मनात भरू लागले… कोल्हापूर हे सिनेजगताचे महत्त्वपूर्ण स्थान – बाबूराव पेंटर (मेस्त्री) यांनी सुरू केले. पुढे भालजी पेंढारकर, शांतारामबापू, अनंत माने व मांढरेबंधू, रमेश देव, अरुण सरनाईक इत्यादींना पाहत व भेटत असू.
शिक्षणासाठी पुण्यात आलो. दरम्यान, कोल्हापूर तेथे प्रसिद्ध पोरे ब्रदर्स यांचे दुकानात आम्ही भावाच्या लग्नाच्या कापड खरेदीस गेलो होतो. सर्व पोरे बंधू परिचयाचे अगदी घरच्यांप्रमाणे. मी व कै. प्रमोद (जुळा भाऊ) ती. दिगंबर पोरे यांचेशी बोलत होतो. तेवढ्यात कै. लताताई व मंडळी साडी खरेदीसाठी आल्या. लगेच दिगंबर पोरे त्यांना म्हणाले हे दोघे बंधू जुळे. पंत दलालचे पुत्र आहेत. ओळखणे कठीण. लताताईने त्यांनी गालात लोभस स्मित केले व आम्हा दोघांकडे पाहत म्हणाल्या. आहे बुवा, फसायला होते. आम्ही त्यांना वंदन केले व पोरे त्यांना घेऊन साड्यां दाखविण्यास गेले. ती लताताईंशी प्रत्यक्ष भेट.
१९८० मध्ये मला लाजपतनगर येथे साऊथ दिल्ली – महाराष्ट्र मित्रमंडळाचा अध्यक्ष निर्विवाद निवडले गेले व कर्तव्य म्हणून स्वीकारले, योगाने ६०-७० फॅमिली एकत्र येऊ लागल्या.
महाराष्ट्र सरकार प्रसारण विभाग येथे श्री. कै. माननीय वसंतराव साठे केंद्रमंत्री यांना दिल्लीत महाराष्ट्र संघटना व कार्यक्रम होण्यासाठी हेजीब यांच्याशी बोलणे केले. मग आपल्या निवासी एक मीटिंग बोलावली. मला पण येण्यासाठी संदेश आला चर्चा झाली. या वेळी संगीत विदुषी मालिनीताई राजुरकर यांचे शास्त्रीय संगीत आयोजिण्यात आले होते. भारतरत्न लताताई मंगेशकर तिथे आल्या होत्या. त्यांचा सन्मान होता. मालिनीताई आमच्या आवडीच्या गायिका. नंतर मध्यंतर व जेवण होते, तेव्हा मी व माझी पत्नी सौ. आरती लताताईंना भेटलो, अभिनंदन केले. मी त्यांना पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या व त्या मनःपूर्वक बोलल्या. त्यांचे एक अविस्मरणीय स्मित करीत म्हणाल्या, कित्येक दिवसांनी मालिनीने शास्त्रीय संगीताचा मला आनंद दिला, ती फार सुंदर गाते. मीपण मालिनीताईचा एक मनापासून श्रोता असून त्यांचे काही चीजांचे वर्णन केले व म्हणालो, मालिनीताईचा जेवणानंतर उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला आहे. लताताई मला म्हणाल्या, माझी पण ऐकण्याची मनस्वी इच्छा आहे, कसे जमले माहीत नाही. लताताईंचा मंजुळ आवाज लक्षात राहिला. त्यांचे अनेक चाहते होते. त्यांना नमस्कार करून आम्ही भोजनासाठी गेलो. ही त्यांची भेट जीवनभर आठवण राहिली.
त्यांचे परलोकवासी होण्याने असंख्य गीते, भक्तिगीते, भावगीते व चित्रपटसंगीत नजरेसमोर रेंगाळत राहिले. त्यांची संपूर्ण अंत्येष्टी पाहून गीत आठवले “कल्पवृक्ष कन्येसाठी” कवी पी. सावळाराम यांचे. शांताबाई शेळके, गदिमा, मंगेश पाडगावकर किती तरी संगीतकार, गीतकार यांना लताताईने अमर केले, संतवाणी जनमानसात पोहोचवली.
प्रकाश एकांडे ज्येष्ठ लेखक