पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर ऋषी सुनक यांची भारतीयांसाठी मोठी घोषणा!

नवी दिल्ली | Rishi Sunak – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची भेट घेतली. इंडोनेशियामधील बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-20 परिषदेत या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी ब्रिटन सरकारनं भारतीयांसाठी दरवर्षी 3000 व्हिसा जारी करण्याची घोषणा केली आहे.
ब्रिटनमध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरूणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेचा फायदा मिळणारा भारत पहिला देश असल्याचं ब्रिटन सरकारनं सांगितलं आहे. या निर्णयामुळे युके-भारत यंग प्रोफेशनल स्कीमवर शिक्कामोर्तब झाल्याचं ब्रिटन सरकारनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी 18 ते 30 वयोगटातील 3000 प्रशिक्षित तरूण दोन वर्षांसाठी ब्रिटनमध्ये वास्तव्य आणि नोकरी करू शकतात. तसंच या योजनेमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास ब्रिटन सरकारनं व्यक्त केला आहे.
दरम्यान, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देशांच्या तुलनेत ब्रिटनचे भारताशी सर्वात चांगले संबंध असल्याचंही ब्रिटन सरकारनं म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे. तसंच भारतीय गुंतवणुकीमुळे ब्रिटनमधील 95 हजार लोकांना रोजगार मिळाला असल्याचंही ते म्हणाले आहेत.