संजय राऊतांना दिलासा नाहीच!, न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढली
मुंबई | Sanjay Raut – शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ (Custody Extended) झाली आहे. संजय राऊतांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढला आहे. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तसंच त्यांना आता 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांनी या अगोदर जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर राऊतांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. तेव्हा विशेष न्यायालयानं त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली होती.
दरम्यान, संजय राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तपास सुरू ठेवू शकते, परंतु आपल्याला तुरुंगात ठेवल्यानं काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा विशेष न्यायालयात केला होता. राऊत यांच्या वकिलाने त्यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयात सादर केला होता. तसंच त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र पुढील आठवड्यातील व्यस्त कार्यामुळे जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होणार नाही, असं विशेष न्या. एम. जी. देशपांडे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावर ईडीच्यावतीने ॲड. कविता पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अवधी मागितला होता. त्यानंतर न्यायालयाने ईडीला राऊत यांच्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.