संजय राऊतांना न्यायालयाचा दणका; जामीन मंजूर नाहीच, कोठडीत वाढ
![संजय राऊतांना न्यायालयाचा दणका; जामीन मंजूर नाहीच, कोठडीत वाढ sanjay raut 1 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/10/sanjay-raut-1-1-780x470.jpg)
मुंबई | पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालयाकडून दणका मिळाला आहे. राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती.
संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर 27 सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, कोर्टानं संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. तसंच कोर्टानं जामीन अर्जावरील सुनावणी 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यानंतर आता त्यांच्या न्यायालयीन कोठडीत सात दिवसांसाठी वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, पत्रा चाळीतील 1039 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा ईडीनं केला आहे. या प्रकरणी ईडीनं नुकतंच आरोपपत्र दाखल केलं आहे. पत्राचाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असून अगदी सुरुवातीपासून ते प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यात राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीनं आरोपपत्रात केला आहे.