ताज्या बातम्यारणधुमाळी

“वार करायचे असतील तर…”, आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान

मुंबई | Aditya Thackeray On Shinde Group – शनिवारी (8 ऑक्टोबर) केंद्रीय निवडणूक आयोगानं रात्री उशिरा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वादावर शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचं निर्देश दिले. त्यानंतर रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होत आहे. वार करायचे असतील तर समोरून या”, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिलं आहे. त्यांनी वरळी मतदारसंघातील कोळीवाड्याच्या दौऱ्याच्या वेळी एबीपी माझाशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, “काल उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. हे अपेक्षित नव्हतं, मात्र झालं. आता लढायचं आणि जिंकायचं, पुढे जायचं आहे. आपल्या राज्यात जे चाललंय ते घटनाबाह्य आहे. गद्दारांचे सरकार हे घटनाबाह्य आहे. संविधानाला सुद्धा यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

खोके सरकारमधला जो काही गद्दारांचा गट आहे तो एकदम निर्लज्जपणे राजकारण खालच्या पातळीवर नेत आहे. इतकं घाणेरडं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच पाहिलं नव्हतं. त्यांना आसुरी आनंद जो शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करताना मिळतोय, तो त्यांना कधीच मिळणार नाही. महाराष्ट्रातील जनता, देशाची जनता शिवसेनेसोबत आहे. खोके सरकारनं स्वत:ला विकलं आहे. दोन-तीन नेत्यांच्या स्टेटमेंटवरून असं दिसतंय की शिवसेना संपवून टाकायची आहे. अडीच वर्षापासून अशाप्रकारचे प्रयत्न सुरू होते, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या 40 आमदारांना सर्व काही दिलं. त्यांच्या त्याच राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे ते पक्ष संपवायला निघाले आहेत. वार करायचे असतील तर समोरून या. यांना स्वत:ची ओळख नाही. माझ्या आजोबांचं नाव घेऊन पक्षाचं नाव घेऊन चिन्ह घेऊन राजकारण करत असाल तर कोणाला पटणार नाही. हिंमत असेल तर 40 जणांनी राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. ती हिंमत त्यांची होत नाही. वार पाठीत करू नका, समोरून करा, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये