रासायनिक घटकांच्या वापराने गंभीर आजार

पुणे ः लोकांचा उन्हाळ्यात आइस्क्रीम, बर्फगोळा, हंडा कुल्फी खाण्यावर भर वाढतो. नक्की कोठे बनवला जातो हा बर्फ याचा शोध घेतला असता, बाणेर, बालेवाडी, आैंध विभागात बनविला जातो. हे आइसकांडी, बर्फ बनविणारे हलक्या खाद्याचा वापर करून रासायनिक घटक वापरून रस्त्यावर हातगाडीद्वारे विक्री करतात. यावर अन्न प्रशासनाचे काहीही निर्बंध नाहीत. मात्र जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे.
बेकरीचे पदार्थ पाव, केक बनविणारे देखील राजरोसपणे रासायनिक घटक वापर करून बनविले जात आहेत. ज्यामुळे स्लोपॉयझनिंगसारखे गंभीर प्रकार घडत आहे. बर्फ गोळा, आइसक्रिम, हंडाकुल्फी, आइसकॅन्डी या खाद्यात काब्रोहायड्रेटचा वापर प्रचंड प्रमाणात करण्यात येतो. प्रीझर्व्हेटिव्ह व अॅडटिव्ह, सायट्रिक अॅसिड, नोमॅटोसारखे द्रव्य यात वापर करतात हे अत्यंत अपायकारक ठरतात. अन्न व औषध प्रशासनाला याबाबत माहिती असतानाही विक्रेत्यांवर निर्बंध का घातले जात नाही?
बाणेर विभागात बेकरीचे कारखाने भरपूर आहेत, परंतु एकानेही अन्न व औषध प्रशासनाचा अधिकृत परवाना घेतला नाही, तरीही हे धंदे राजरोसपणे करत आहे. वडा, मिसळ आणि अनेक ठिकाणी पावाचा वापर करतात. कारखान्याचे व्यापारी पीठ मळताना फेट्स सल्फेट, कॅल्शियम सल्फेट, थियामिन, ब्रोमेट हे रासायनिक घटकांचा वापर करतात. ब्रेड, पाव नरम रहावे म्हणून बेंजाईल, पेरोक्साईड, एसिटोनसारख्या घटकाचा वापर करतात.
ब्रेड, पाव, बर्फ विकणारे भेसळयुक्त विक्री करीत आहेत. यावर कोणतेही निर्बंध नाही. हातगाडीवर बर्फ गोळा बनविणारे हलक्या प्रकारचा कलर वापर करतात. लहान मुलांच्या आरोग्याला हे धोकादायक आहे. या विभागात बर्फ बनविणारे कारखाने भरपूर आहे. निकृष्ट आणि पिण्यायोग्य नसलेले साठवलेले पाणी बर्फ बनविण्यासाठी वापर करतात, यावर कोणाचेही नियंत्रण नाही. आरोग्य विभागाकडून या कारखान्याची तपासणी केली जात नाही. राजरोसपणे निकृष्ट पाण्याचा वापर करून बर्फ बनविण्याचा प्रकार सुरू आहे. या दूषित घटकामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. हे घटक विशिष्ट तापमानालाही जिवंत राहू शकतात, अशा प्रकारचा बर्फ शरीराला घातक ठरतो. आरोग्य, अन्न औषध प्रशासन विभाग आणि महानगरपालिका यावर कारवाई का करीत नाही? मानवी जिवाशी खेळ होतोय, यावर आरोग्य विभागाने लक्ष घालणे गरजेचे आहे.