पवार-ठाकरेंचेही ‘भारत जोडो’

अर्थव्यवस्थेवरून भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता
मुंबई : देशभरातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि अन्य प्रश्न या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रे’ला सुरुवात केली आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत निघालेल्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही मुंबई काँग्रेसच्या वतीने गांधी जयंतीला या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शनही केले जाणार आहे. एकीकडे ‘भारत जोडो यात्रे’च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची देशभर धामधूम दिसून येत असून दुसरीकडे महाराष्ट्रातही राजकीय वारे चांगलेच पसरले असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात ही यात्रा १६ दिवसांमध्ये ३८३ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्थेवरून केंद्रातील भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल करण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेचे निमंत्रण स्वीकारले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पवार आणि ठाकरे हे दोन्ही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली. हे दोन्ही नेते या यात्रेत सहभागी होतील असे काँग्रेस नेत्यांकडूनही सांगितले जात आहे. असे झाल्यास महाराष्ट्रात महाविकास आघाडी अधिक मजबूत असल्याचा संदेशच राजकीय वर्तुळात अथवा जनतेपर्यंत जाण्याचा आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यासाठी मंगळवारी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांना भारत जोडे यात्रेचे निमंत्रण दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची देखील भेटी घेतली होती. आता हे दोन्ही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी शिष्टमंडळासह या दोन्ही नेत्यांची भेट घेतली होती.
त्यामुळे हेच निमंत्रण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील अनेक सामाजिक संस्थांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार अनेक संस्थांनी यात्रेला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येते.
एकूणच वातावरण पाहता राज्यातही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेतून भाजपला धारेवर धरले जाणार आहे. तर पवार स्वत: या यात्रेत सहभागी होतील. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासोबत काही काळ पायी चालण्याची शक्यता आहे. एकेकाळी काँग्रेसविरोधावरच उभ्या राहिलेल्या शिवसेनेतील ठाकरेसेना आता काँग्रेसच्या आणखी जवळ जाणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात प्रवेश
कन्याकुमारीतून सुरू झालेली भारत जोडो यात्रा जम्मू आणि काश्मीरमध्ये संपणार आहे. एकूण तीन हजार ५०० किलोमीटरचा प्रवास करुन १२ राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे. संपूर्ण दौरा पूर्ण होण्यासाठी तब्बल दीडशे दिवस लागणार आहेत. सध्या ही यात्रा कर्नाटक राज्यात सुरू असून ७ नोव्हेंबरला ही यात्रा नांदेडमध्ये धडकणार आहे.