“आम्हाला मदत करा, आमचा देश वाचवा”; श्रीलंकन लोकप्रतिनिधींची भारताला कळकळीची विनंती

नवी दिल्ली Shri Lanka Crisis : भारताच्या शेजारील देश श्रीलंका सध्या बिकट आर्थिक परिस्थितीशी झुंज देत आहे. त्यामुळे तेथील राजकीय स्थिती देखील विकोपाला गेली आहे. देशातील संतप्त नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यामुळे श्रीलंकेत सर्व पक्षांकडून सत्तापालट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, श्रीलंकेतील विरोधी पक्षनेत्यांकडून भारत सरकार आणि भारतीयांना मदतीचे आव्हान करण्यात येत आहे.
राजकीय अस्थिरतेवर तोडगा काढण्यासाठी श्रीलंकेत सर्वपक्षीय बैठका होत आहेत. दरम्यान नवीन राष्ट्राध्यक्ष कोण असेल यावर चर्चा सुरु आहे. दरम्यान, भावी राष्ट्राध्यक्ष समजल्या जाणारे विरोधी पक्ष नेते साजित प्रेमदासा यांनी ट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतातील सर्व पक्षातील नेते आणि भारतीय जनतेला आमचा देश वाचवण्यासाठी मदत करा अशी कळकळीची विनंती केली आहे.
ट्वीट मध्ये साजित प्रेमदासा यांनी म्हटलं आहे की, ‘श्रीलंकेत उद्या कोणाचीही सत्ता असो आमची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतातील सर्व पक्ष आणि भारतीय जनता यांना कळकळून विनंती आहे कृपया आमचा देश वाचवण्यासाठी मदत करा. जेणेकरून आमचा देश यातून बाहेर पडेल.’
भारतात देखील श्रीलंकेच्या मदतीसाठी बैठका पार पडल्या आहेत. भारताकडून श्रीलंकेची शक्य तेवढी मदत करण्याची तयारी आहे.