राज्यभरात उपक्रम – शाळांमध्ये आंनददायी अभ्यासक्रमांचा समावेश

पुणे : शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना आनंद देणार्या वेगवेगळ्या उपक्रमांचा समावेश करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. गोष्ट, छोटे खेळ, अनुभवकथन, श्वासांवरील क्रिया, मुक्त हालचाली, चालण्याची पद्धत, प्रसंगनाट्य, गाणी, कवितांचे सादरीकरण, अवांतर वाचन अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शाळांमध्ये आनंददायी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित संस्थांच्या सर्व मराठी शाळांमध्ये हा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे. सध्याच्या काळात गुणवत्तापूर्ण शाळेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जागतिक स्तरावरूनही शिक्षणात मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल केले जात आहेत. त्यामुळे शाळेतील वातावरण प्रसन्न असणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेत जावेसे वाटेल, असे शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यांची ही गरज पूर्ण व्हावी, या उद्देशाने हा आनंददायी शिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांचे वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांना चांगल्या सवयी लावणे, सहकार्य वृत्ती आणि नेतृत्वगुणांचा विकास करणे, हा या अभ्यासक्रमाच्या शिकवणीमागचा मुख्य हेतू असणार आहे. गेल्या वर्षी हा उपक्रम भोर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता.
त्यानंतर आता संपूर्ण राज्यभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून, सजगता, गोष्ट, कृती आणि अभिव्यक्ती अशा चार प्रकारांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. सोमवार ते शनिवार या सहा दिवसांत कोणते उपक्रम घ्यावेत, याबाबतही शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. कोणत्या दिवशी काय उपक्रम घ्यायचा, याचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आनंद घेऊन शिक्षण मिळावे, हा या उपक्रमामागचा उद्देश असणार आहे. शाळा सुरू होताना परिपाठानंतर विद्यार्थ्यांनी जर वेगवेगळ्या उपक्रमांमधून आनंद घेत माहितीचे ग्रहण केले, तर शिकण्यासाठी अधिक उत्तम वातावरण तयार होईल, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
आनंददायी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शाळांना परिपाठ झाल्यानंतर पहिल्या तासातील ३५ मिनिटांमध्ये करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. प्रत्येक दिवशी ठरलेल्या नियोजनानुसार परिपाठ झाल्यानंतर विद्यार्थी पुस्तकी शिक्षण सुरू करण्याआधी आनंददायी अभ्यासक्रमाचा आस्वाद घेतील. अभ्यासक्रमाच्या नियोजनाप्रमाणे उपक्रम पार पाडावेत, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.