ताज्या बातम्यारणधुमाळी

जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या,”…तर मी या अटकेचं मनापासून स्वागत करते”

मुंबई | Supriya Sule On Jitendra Awhad Arrest – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना माॅलमध्ये सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण देखील करण्यात आली होती. त्या प्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. जितेंद्र आव्हाडांना अटक केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

“जो चूक करतो त्याला पूर्णपणे माफी मिळते आणि जो एखादं आंदोलन करतो त्याला शिक्षा दिली जाते. यातून मला ब्रिटीश राजवटीचे दिवस आठवले. जितेंद्र आव्हाड हे एक लढवय्ये नेते आहेत. त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. पोलीस ठाण्यात गेल्यावर कळालं की, पोलिसांवर दबाव येतोय. पण आता वरून दबाव येतोय म्हणजे कुठून दबाव येतोय? याचं उत्तर माझ्याकडे नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, “अटकेसाठी दबाव आणल्याबाबत मी कुणावरही आरोप करत नाही. कारण वरून दबाव येतोय म्हणजे यामध्ये बिचाऱ्या पोलिसांची काहीही चूक नाही. महाराष्ट्राच्या पोलिसांना कुणाचे फोन येत असतील आणि याबाबत चर्चा होत असेल, तर वरून दबाव येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असंच एकंदरीत या सर्व घटनेतून दिसत आहे.”

“एखादा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात काहीतरी चुकीचं दाखवत असेल आणि दुसरी व्यक्ती त्याविरोधात आपल्या वेदना मांडत असेल, यामुळे आव्हाडांना जर अटक होत असेल तर मी अटकेचं मनापासून स्वागत करते. त्या कामासाठी आम्हाला सर्वांनाही तुरूंगात जावं लागलं तरी चालेल कारण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. या कामासाठी जितेंद्र आव्हाड तुरुंगात जात असतील, तर आव्हाडांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे सरकारनं उत्तर दिलं पाहिजे की, तुम्ही नक्की कुणाच्या बाजुने आहात? तुम्ही छत्रपतींच्या विरोधात असाल तर तसं स्पष्ट करा, मग ही लढाई पूर्ण ताकदीने लढू”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये