सावरकर यांच्यांवरील वादात हिंदू महासंघाने महात्मा गांधी यांना आणले; पाहा काय म्हणाले आनंद दवे?

पुणे | मानहानी प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची माफी मागण्यास राहुल गांधींना सुचवलं जात असतानाच त्यांनी ‘माफी मागायला माझं आडनाव सावरकर नाही, गांधी आहे’ असं म्हणत आगीत तेल ओतलं होतं. हे प्रकरण आता चांगलंच चिघळलं आहे. परंतु राहूल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर स्वातंत्रवीर सावरकर प्रेमी, भाजप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी राहुल गांधी यांच्यांवर टीका केली. अशातच आता हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे.
हिंदू महासंघ आज राहुल गांधी यांना अंदमान ची तिकीटे पाठवणार असून त्यांनी एक दिवस त्या कोठडीत राहून दाखवावे असे आव्हान हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केले आहे. 28 रोजी दिल्लीहून जाण्याचं आणि 30 रोजी येण्याच तिकीट आज राहुल गांधी यांना मेल करत आहोत, असे आनंद दवे यांनी म्हटले.
काय म्हणाले आनंद दवे?
सावरकारंवर बोलणं थांबलं नाही तर मग मात्र महात्मा गांधीची 100 पापं आम्ही समोर ठेऊ, भारताची झालेली फाळणी, हिंदूंचा झालेला नरसंहार यांची पुस्तके प्रसिद्ध करु, काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, असे वक्तव्य आनंद दवे यांनी केले. राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांचा अभ्यास केला असता तर त्यांनी अशी वक्तव्य केली नसती. कारण इंदिरा गांधींनी 11 हजारांची देणगी सावरकर प्रतिष्ठानसाठी दिली होती. या देशाला दुसरा गोडसे परवडणार नाही. कारण गांधी होते म्हणून गोडसे तयार झाले, असं आमचं म्हणणं असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय पक्षाच्या उद्दीष्टांसाठी कोणाला टार्गेट ठेवणं बरोबर नाही, सावरकारंवर टीका केली की प्रसिद्धी मिळते, यामुळे राहुल गांधी वारंवार त्यांच्यांवर टीका करत आहे, असे दवे म्हणाले.