विश्लेषण

मिटकरींच्या ‘ब्रह्मास्त्रा’चे ‘राष्ट्रवादी’वरच बुमरँग?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजावर टीका करताना सोडलेले ‘ब्रह्मास्त्र’ त्यांच्याच पक्षासाठी ‘बुमरँग’ ठरले आहे, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये सुरु आहे. हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी मिटकरी यांच्या भाषणादरम्यान व्यासपीठावर जोरदार हशा पिकला होता. जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यादम्यान खदखदून हसत होते. अखेर, पुढे आणखी मान्यवरांची भाषणे होणार असल्याने वेळेअभावी मिटकरी यांना भाषण थांबवण्यास सांगण्यात आले.

मिटकरी यांनी ब्राह्मणांवर टीका करत सोडलेले ब्रह्मास्त्र राज्यामध्ये ब्राह्मणांचा एल्गार पाहून त्यांच्यावरच उलटल्याचे दिसून येते. यापुढे ब्राह्मण समूहाची चेष्टा करणे कोणालाही यापुढे महागात पडेल, असाच तो उद्रेक होता. किंबहुना, ब्राह्मण समाज राजकीय आखाड्यात एकवटलेला प्रथमच पाहायला मिळाला. मिटकरी यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने डावपेच टाकण्याचे ठरवले होते. पण, राजकारणाच्या सारीपटावर त्यांच्यावरच ते बुमरँग झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पुण्यात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर त्यांच्याकडून आंदोलन करण्यात आले. ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते येणार असल्याचे कळल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले होते. यादरम्यान तणाव वाढून दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. मिटकरींनी पुरोहित वर्गाची आणि ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केला. तसेच या प्रकरणी मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राजकीय डावपेच?
पुण्यातील आंदोलन हे कोणत्याही पक्षातर्फे नसून ब्राह्मण महासंघ या संघटनेमार्फत करण्यात आले होते. भाजपकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया सुरुवातीला आली नाही. तज्ज्ञांच्या मते, याचे प्रमुख कारण म्हणजे, ’भाजपच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत झालेले प्रमुख बदल!’

भाजप हा शेटजी-भटजींचा पक्ष आहे, अशी टीका पूर्वीच्या काळी भाजपवर केली जायची. भाजपमध्ये केवळ उच्चवर्णीय नेत्यांची गर्दी आहे. उच्चवर्णीयांचेच प्रश्न भाजप हाती घेतो, असा आरोप केला जायचा. पण पुढे जनमानसातील आपली प्रतिमा बदलण्यासाठी भाजपने ‘माधवम’ म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी आणि मराठा हा फॉर्म्युला हाती घेतला.
फडणवीसांच्या काळात अनेक मराठा नेते भाजपमध्ये सहभागी झाले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भाजपला बहुजन चेहरामोहरा देण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहे. अशा स्थितीत वर्षानुवर्षे आपल्या वर्चस्वाखाली असलेले बहुजन-विशेषतः मराठा मतदार भाजपकडे जाऊ नयेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असतात. त्याच प्रयत्नांचा हा भाग असू शकतो, असे तज्ज्ञांना वाटते.

या पार्श्वभूमीवर भाजप ब्राह्मणांची बाजू मांडण्यास पुढे आला तर त्यांची कोंडी करता येऊ शकेल, असा विचार राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी केला आहे, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती. पण, भाजपने काही वेळाने काही होईना, यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले मिटकरींवर टीका करताना म्हणाले, पवित्र हिंदू संस्कृतीची खिल्ली उडवणारा अमोल मिटकरी ’शकुनी’ मामा आहे. हिंदू समाज या बांडगुळांना आणि शकूनी मामाच्या फौजेला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.

या वक्तव्यानंतर वातावरण तापत असल्याचे पाहून जयंत पाटलांसह धनंजय मुंडे यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
ज्या वक्तव्यावर सभेदरम्यान खळखळून हसत होते, ते वक्तव्य अमोल मिटकरी यांचे वैयक्तिक मत असून त्याच्याशी पक्षाचा काहीएक संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दोन्ही नेत्यांकडून देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये