रविंद्र धंगेकर घासून नाय, ठासून आले.. भाजपचा 28 वर्षांचा कसबा बालेकिल्ला काँग्रेसनं हिसकावला!

पुणे : (Kasba By poll Election Ravindra Dhangekar Win) संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे. २८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडाला धंगेकरांनी सुरुंग लावला आहे. पहिल्या फेरीपासून अगदी शेवटच्या २१ व्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर यांनी आघाडी कायम ठेवली. सरतेशेवटी रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांना ११ हजार मतांनी पराभवाची धूळ चारत विधानसभेत पाऊल ठेवलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळातील नेते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार-खासदार यांच्यासह पुण्यातील १०० पेक्षा जास्त माजी नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची फौज हेमंत रासने यांच्या प्रचाराच्या कामाला लागली होती. पण धंगेकारांच्या झंझावातापुढे कोणाचाच निभाव लागला नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाच ते सहा मंत्री कसब्यात तळ ठोकून होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील शेवटचे सहा दिवस कसब्यातच होते. इतकंच काय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसब्यात घर घेऊन ते प्रत्येक अपडेटवर जातीने लक्ष ठेऊन होते. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठीही राज्यातील बड्या नेत्यांनी हजेरी लावली. मात्र धंगेकरांच्या भोवतीच निवडणूक राहील, याची पुरेपूर काळजी संबंधित नेत्यांनी घेतली. त्याचा परिपाक म्हणजे भाजपला ही निवडणूक मोदी-शहा विरुद्ध काँग्रेस अशी करण्याची संधी मिळालीच नाही. पर्यायाने शेवटपर्यंत ही निवडणूक भाजप विरुद्ध रवींद्र धंगेकर अशीच राहिली.
रवींद्र धंगेकरांकडून मतदारांचे आभार…
जनतेने माझ्यावर मतांचा पाऊस पाडला. खरंतर पहिल्या दिवसांपासून जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती. कामाचा माणूस निवडून द्यायचा हे जनतेने ठरवलं होतं. जनतेने माझ्यावर आता मोठी जबाबदारी टाकलीये. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी इथून पुढच्या सव्वा वर्षात १८-१८ तास काम करेन, अशी विजयी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली.

हेमंत रासनेंची प्रतिक्रिया
जनतेचा कौल मला मान्य आहे. मी कुठे कमी पडलो, याचं मी आत्मचिंतन करेन. भाजप नेतृत्वाने मला उमेदवारी दिली. माझ्यावर विश्वास टाकला, याबद्दल नेतृत्वाचं मी आभार मानतो. धंगेकरांना विजयासाठी शुभेच्छा देतो.