मुख्यमंत्री कार्यालयात जाण्याआधी केलेल्या पूजेवरून राष्ट्रवादीच्या आमदाराचं शिंदेंवर टीकास्त्र!
![मुख्यमंत्री कार्यालयात जाण्याआधी केलेल्या पूजेवरून राष्ट्रवादीच्या आमदाराचं शिंदेंवर टीकास्त्र! Eknath Shinde 7](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/Eknath-Shinde-7.jpg)
मुंबई – एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदा मंत्रालयात आले. मात्र मुख्यमंत्री कार्यालयात जाण्याआधी त्यांनी पूजा केली. त्यानंतर कार्यालयात प्रवेश केला आणि मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे हे धार्मिक आहेत त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतू महाराष्ट्राचं शासकीय कामकाज हे संविधानावर चालत असून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. पूजा आणि विधीचे अधिकार आपल्या घरातच असावेत. सेक्युलर राष्ट्रामध्ये पूजा केली जात असेल, तर हे निंदनीय असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शासकीय कार्यालयात धार्मिक विधी होता कामा नये, हा संविधानाचा अपमान आहे, असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे जेव्हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री कार्यालयात आले तेव्हा त्यांचं सर्व कुटुंब त्यांच्यासोबत होतं. शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित होते.